(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
संगमेश्वर-उजगाव मार्गावरील माभळे येथे बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात टळल्याची घटना घडली. घसरड्या झालेल्या रस्त्यावरून एक रिक्षा थेट दरीत कोसळली; मात्र चालक आणि प्रवाशांनी प्रसंगावधान राखत वेळीच उडी मारल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
माभळे ते सडा मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम जिल्हा परिषद सदस्या सौ. माधवी गीते यांच्या पाठपुराव्याने आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने मंजूर झाले आहे. काम सुरू करण्यापूर्वी ठेकेदाराने मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन करून ती रस्त्यालगत टाकून ठेवली होती. पहिल्याच पावसात ही माती वाहून रस्त्यावर आल्याने संपूर्ण मार्ग चिखलमय आणि अत्यंत घसरडा बनला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत ठेकेदाराला अनेकदा सूचना देत धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर गटार काढण्याचे काम सुरू करण्यात आले; मात्र कोणतीही सुरक्षितता न पाळता आणि योग्य नियोजनाअभावी रस्ता आणखी धोकादायक बनल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
बुधवारी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास उजगाव येथील कानसरे हे प्रवाशांसह रिक्षातून घरी जात होते. माभळे परिसरातील उतारावर रिक्षाचा ताबा सुटला आणि वाहन थेट दरीत कोसळले. प्रसंगावधान राखत चालक व प्रवाशांनी तत्काळ उडी मारल्याने सर्वांचे प्राण थोडक्यात बचावले. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “पहिल्याच पावसात रस्त्याची ही अवस्था होत असेल, तर पुढील काळात मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

