( संगमेश्वर )
तालुक्यातील कनकाडी (गराटेवाडी) येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) सकाळी उघडकीस आली. हर्षद संजय रांधिम (वय १७) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षद मंगळवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे झोपला होता. मात्र, बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घरातील मंडळी उठल्यानंतर त्यांना मागच्या पडवीत हर्षद गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. हे पाहताच त्याची आई व बहिणीने हंबरडा फोडला. त्यांच्या आक्रोशामुळे शेजारी धावून आले आणि तातडीने ही माहिती पोलीस पाटील समीक्षा खांदारे यांना देण्यात आली.
यानंतर साखरपा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नामदेव जाधव, सहाय्यक उपनिरीक्षक शांताराम पंदेरे, तसेच हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासणीसाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला.
हर्षदने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हर्षदच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. या घटनेने कनकाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

