(रत्नागिरी)
खूप गाजावाजा झालेल्या आणि राज्यातील सत्तेची समीकरणे बदलणाऱ्या लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थीची फेर पडताळणी होणार असल्याचे जाहीर होताच, या योजनेचा लाभ मिळालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील असंख्य लाडक्या बहिणींच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींच्या अर्जाची फेरपडताळणी घरोघरी जाऊन केली जाणार आहे. एकप्रकारे आम्हा लाडक्या बहिणींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील लाभार्थी बहिणींनी फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत. पडताळणीला येताना आम्ही विधानसभा निवडणुकीत दिलेली मतेही परत घेऊन यावी आणि विनाचौकशी आम्हाला पात्र ठरवून आमच्या खात्यात पैसे जमा करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर प्रथम कारवाई करावी, अशी मागणी लाडक्या बहिणीकडून केली जात आहे.
महिलांच्या अर्जाची केली जाणार पुन्हा पडताळणी
दरम्यान लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही निकष तयार केले आहेत, मात्र या निकषात बसत नसताना देखील अनेक महिलांकडून या योजनेचा लाभ घेतला जात असल्याचं सरकारच्या लक्षात आले आहे, असे आता सांगितले जात आहे. त्यामुळे आता सरकारकडून अशा महिलांच्या अर्जाची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी या योजनेतून आऊट होण्याची शक्यता आहे.
गेल्या जुलैपासून योजनेची अंमलबजावणी
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना सरकारनं चालू केली आहे. गेल्या वर्षी जुलैपासू या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत या योजनेचे एकूण सात हफ्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.
दर महिन्याला जिल्ह्यात ६१ कोटी ५४ लाख रुपये होतायत खर्च
जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. साडेचार लाख अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ४ लाख १८ हजार ८२४ अर्ज मंजूर झाले आहेत. यामुळे दर महिन्याला ६१ कोटी ५४ लाख २३ हजार रुपये या योजनेपोटी जिल्ह्यात लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होतात.
केवळ मतांवर डोळा ठेवून दिली रक्कम
निकषात बसत नसताना लाभ घेतला जात आहे हे सरकारला आताच कसे दिसले, निवडणुकीआधी मतांच्या राजकारणात सरकारला कसे दिसले नाही. त्याचवेळी निकषानुसार निवड झाली असती तर सरकारवर ही वेळच आली नसती. मात्र निकष डावलून केवळ मतांवर डोळा ठेवूनच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ही योजनेची रक्कम जमा करण्यात आली. आता “काम सरो…” या म्हणीप्रमाणे फडणवीस सरकारची गत झाल्याचा आरोपही केला जात आहे