(मुंबई)
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या BEST कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे. 18 ऑगस्टला मतदान पार पडले होते, तर मंगळवारी मध्यरात्री अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल आणि महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनल यांच्यात थेट लढत होईल, असा अंदाज होता. मात्र सर्वांचा अंदाज चुकवत शशांक राव यांच्या पॅनलने तब्बल १४ जागांवर विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधले. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलला केवळ ७ जागा मिळाल्या, तर ठाकरे-मनसे आघाडीच्या उत्कर्ष पॅनलला एकाही जागेवर यश मिळाले नाही.
ठाकरे गटाचे वर्चस्व संपुष्टात
गेल्या नऊ वर्षांपासून BEST पतपेढीवर ठाकरे गटाचे एकहाती वर्चस्व होते. मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे उलटी झाली. ही निवडणूक ठाकरे बंधूंच्या युतीसाठी “लिटमस टेस्ट” मानली जात होती. परंतु एकाही जागेवर विजय न मिळाल्याने राज आणि उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे.
शशांक राव पॅनलच्या विजयाचे सूत्र
शशांक राव यांच्या पॅनलला कामगार संघटनांमध्ये दीर्घकाळ केलेले काम, आंदोलनांचा अनुभव आणि BEST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर वेळोवेळी घेतलेला पुढाकार याचा फायदा झाल्याचे मानले जात आहे. तब्बल १५ हजार मतदारांनी ठाकरे बंधू आणि महायुती दोन्ही आघाड्यांना नाकारून शशांक राव पॅनलला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे.
पॅनलनिहाय निकाल :
शशांक राव पॅनल – १४ विजयी उमेदवार
1. आंबेकर मिलिंद शामराव
2. आंब्रे संजय तुकाराम
3. जाधव प्रकाश प्रताप
4. जाधव शिवाजी विठ्ठलराव
5. अम्मुंडकर शशिकांत शांताराम
6. खरमाटे शिवाजी विश्वनाथ
7. भिसे उज्वल मधुकर
8. धेंडे मधुसूदन विठ्ठल
9. कोरे नितीन गजानन
10. किरात संदीप अशोक
11. डोंगरे भाग्यश्री रतन (महिला राखीव)
12. धोंगडे प्रभाकर खंडू (अनुसूचित जाती/जमाती)
13. चांगण किरण रावसाहेब (भटक्या विमुक्त जाती)
14. शिंदे दत्तात्रय बाबुराव (इतर मागासवर्गीय)
सहकार समृद्धी पॅनल (प्रसाद लाड गट) – ७ विजयी उमेदवार
1. रामचंद्र बागवे
2. संतोष बेंद्रे
3. संतोष चतुर
4. राजेंद्र गोरे
5. विजयकुमार कानडे
6. रोहित केणी (महिला राखीव)
7. रोहिणी बाईत

