(पिंपरी चिंचवड /पुणे)
पिंपरी चिंचवड शहर हादरवून टाकणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर हत्या प्रकरणाचं गूढ अखेर उकललं आहे. ही हत्या कोणत्याही वैचारिक वा सामाजिक वादातून नव्हे, तर पत्नीने केलेल्या विश्वासघातातून झालेल्या गुन्ह्याचा परिणाम असल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं आहे. नकुल भोईर यांच्या पत्नी चैताली भोईर हिनं आपल्या प्रियकर सिद्धार्थ पवार याच्यासोबत मिळून पतीचा गळा आवळून खून केल्याचं समोर आलं आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
घटनेचा तपशील
शुक्रवारी (२४ रोजी) पहाटे साडेतीनच्या सुमारास भोईर कॉलनी लिंक रोड, चिंचवड येथे नकुल भोईर यांचा मृतदेह आढळला. सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू किंवा अपघात असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शरीरावरच्या संशयास्पद खुणा पाहून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. प्राथमिक अहवालात गळा आवळल्याचे पुरावे सापडल्याने चौकशीचा केंद्रबिंदू पत्नी चैतालीभोवती गेला. तिच्या उत्तरांमध्ये आढळलेल्या विसंगतीमुळे संशय बळावला आणि पोलिसांनी तिला कसून चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
हत्या का झाली?
तपासादरम्यान चैतालीने गुन्ह्याची कबुली दिली. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, तिचे सिद्धार्थ पवार या तरुणाशी अनैतिक संबंध होते. नकुल भोईर हे पत्नी चैतालीच्या वर्तनाबाबत आणि दारूच्या व्यसनाबद्दल वारंवार समज देत असल्याने दोघांमध्ये वाद व्हायचे. याच रागातून आणि प्रियकराच्या मदतीनं तिनं पतीचा जीव घेण्याचा कट रचला. चैतालीने शुक्रवारी पहाटे सिद्धार्थला घरात बोलावलं. नकुल झोपेत असताना, दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर घरातील परिस्थिती सामान्य असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पोलिसांचा तपास आणि पुरावे
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांसह मोबाइल कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजमधून सिद्धार्थच्या घराजवळील उपस्थितीचे पुरावे मिळाले होते. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांमुळे आणि शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून पोलिसांना शंका आली. दरम्यान मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सिद्धार्थचा चैतालीच्या घराजवळ कायम येणं-जाणं दिसून आलं. या पुराव्यांवरून सिद्धार्थचा शोध घेऊन त्यालाही अटक करण्यात आली. पोलिसांकडून आरोपींच्या मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांचीही तपासणी सुरू आहे. गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, किंवा खुनानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, हेही तपासलं जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

