(मुंबई / वार्ताहर)
समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट (संस्था) आयोजित राज्यस्तरीय ‘विकासरत्न प्रेरणा पुरस्कार २०२६’ सोहळा १९ एप्रिल रोजी कांदिवली (पूर्व) येथील अशोक सावंत हॉल, सरोवा कॉम्प्लेक्समध्ये उत्साहात पार पडला. या सोहळ्यात अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, समाजसेवक आणि पत्रकार गणेश तळेकर यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला मागठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सुर्वे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ कवी, साहित्यिक व समाजसेवक बाळासाहेब तोरस्कर यांनी अध्यक्षस्थान भूषवले. ग्रीन्डलेज फार्मास्युटिकल प्रा. लि.चे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर रामकृष्ण हरिशेट कोळवणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सोहळ्याची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी मंगेश नाईक, उत्तम सोनवणे, अशोक मोहिते, नेव्हीनाथ खोत (सांगली) यांची उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शन डॉ. रावसाहेब नाना घोडेराव (छत्रपती संभाजीनगर) यांनी केले. स्वागताध्यक्ष म्हणून समाजसेविका व कलाकार सौ. मीनाक्षी पाखरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमात डॉ. सौ. अलका भरत नाईक (कौन्सिलिंग सायकोलॉजिस्ट, संचालिका – मानाची, मुंबई) यांचीही विशेष उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रदीप बापू रासकर, वैभव बागवे आणि संगीता वानखेडे यांनी केले.
सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. शिफा पवार (चंद्रपूर) हिने स्वागत नृत्य सादर केले, स्निजा फडतरे (बोरिवली) हिने पोवाडा सादर केला, भास्कर निब्रा (धुळे) यांनी गीत सादरीकरण केले. तसेच आशिष सातपुते (मिमिक्री), प्रमोद सूर्यवंशी (नृत्य), उपासना किरपण (लावणी), गोविंद मालोणकर (साईबाबा वेशभूषा) आदी कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘विकासरत्न प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात कला, साहित्य, समाजकार्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला.

