(मुंबई)
मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असलेली सरदार रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर महाराष्ट्रात परत आली आहे. लंडनमध्ये झालेल्या लिलावातून महाराष्ट्र सरकारने ही तलवार विकत घेतली असून, ‘सेना साहेब सुभा पराक्रम दर्शन’ या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिचे लोकार्पण करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमीत संपन्न झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात ही तलवार महाराष्ट्रात परत आल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. त्यांनी सांगितले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले स्वराज्य अधिक भक्कम करणाऱ्या पराक्रमी सरदारांमध्ये सरदार रघुजी राजे भोसले यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या तलवारीच्या पुनरागमनाने आपल्या इतिहासाची उजळणी नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.” कार्यक्रमात सरदार रघुजी राजे भोसले यांचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी तलवार परत आणल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले व या ऐतिहासिक क्षणाबद्दल आनंद व्यक्त केला.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी सांगितले की, “तलवारीच्या लिलावाची माहिती मिळाल्यानंतर केवळ तीन दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून ती महाराष्ट्रात परत आणण्यात यश मिळाले. नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची ही तलवार आपल्यासाठी अभिमानाचा विषय आहे.” तलवार मुंबई विमानतळावर आल्यानंतर, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी तिचा ताबा घेतला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ती पु. ल. देशपांडे कला अकादमीत पोहोचवण्यात आली.
इतिहासाची जिवंत ओळख: गडकिल्ल्यांचे विशेष प्रदर्शन
तलवारीसह राज्यातील १२ वारसासंपन्न गडकिल्ल्यांची माहिती देणारे विशेष प्रदर्शन १९ ते २५ ऑगस्टदरम्यान पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी ११ ते संध्याकाळी ७ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. या प्रदर्शनाचा उद्देश म्हणजे तरुण पिढीला आपल्या इतिहासाची आणि परंपरेची साक्षात अनुभूती देणे असल्याचे पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या वतीने सांगण्यात आले.

