(मुंबई)
राज्यात मागील 24 तासांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने 21 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, कोकण आणि उपनगरांमध्ये काल पहाटेपासून पावसाने जोर धरला असून, त्यामुळे अनेक विभागात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “राज्यातील ज्या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा आहे, तिथे सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. आपत्ती परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे व आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे.”
15-16 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट; एनडीआरएफ पथक तैनात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “राज्यात 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून खबरदारीच्या उपाययोजना देण्यात आल्या आहेत. जिथे अतिवृष्टीचा धोका आहे, तिथे एनडीआरएफच्या टीम्स तैनात आहेत.” वशिष्ठ, जगबुडी आणि अन्य काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, त्या ठिकाणी सतत निरीक्षण आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
चार लाखांहून अधिक पिके बाधित; शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीसाठीही पावसाचा फटका बसलेला आहे. फडणवीस यांनी सांगितले की, “जळगाव जिल्ह्यात शेती आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 800 गावे बाधित असून, एक हजार हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे. राज्यभरात एकूण चार लाख हून अधिक शेतीपिके अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत. तिथे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल.”
मुंबईतील स्थिती नियंत्रणात; वाहतूक सुरळीत
मुंबईत 170 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तरीही वाहतूक आणि लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. “लोकल गाड्या थोड्या उशिराने चालत आहेत, मात्र कुठेही थांबलेल्या नाहीत. रस्त्यावरील वाहतूकही सुरु आहे,” असे ते म्हणाले. मुंबईतील 14 ठिकाणी वॉटर लॉगिंगची स्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी पंपिंग यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. समुद्रात 3.5 मीटर उंच लाटांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
शाळांबाबत निर्णय संध्याकाळी
आजच्या पावसामुळे अनेक भागातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्या बुधवारी शाळा सुरू ठेवायच्या की नाही, याबाबतचा निर्णय हवामानाचा अंदाज पाहून आज सायंकाळपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना संध्याकाळी 4 नंतर घरी जाण्याची मुभा दिली आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न, अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन लोकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

