(मुंबई)
आजकाल सायबर गुन्हेगार फक्त सामान्य नागरिकांनाच नव्हे, तर प्रतिष्ठित व्यक्तींनाही आपली फसवणूक साधण्याचे लक्ष्य बनवत आहेत. अशाच एक घटनेत इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापिका, राज्यसभा खासदार आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांना फेक कॉल करून धमकी देण्यात आली.
मूर्ती यांच्या तक्रारीनुसार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९:४० वाजता एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. कॉलवर बोलणाऱ्याने स्वतःला दूरसंचार मंत्रालयाचा कर्मचारी असल्याचे सांगितले आणि धमकी दिली की, “तुमचा मोबाइल क्रमांक जानेवारी २०२० मध्ये आधार कार्डशी संलग्न न करताच नोंदणीकृत करण्यात आला आहे. मोबाइल त्वरित आधारशी न जोडल्यास सेवा बंद केली जाईल. सध्या तुमच्या नंबरवरून अश्लील व्हिडिओ पाठवले जात आहेत. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत मोबाइल सेवा खंडित केली जाईल.”
त्यानंतर कॉल करणाऱ्याने मूर्तींकडून गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि असभ्य भाषा वापरली. या घटनेनंतर सुधा मूर्ती यांनी २० सप्टेंबर रोजी बंगळूरु सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली.
पोलिसांनी सांगितले की, जेव्हा सुधा मूर्ती यांनी वैयक्तिक माहिती देण्यास नकार दिला, तेव्हा कॉलरने त्यांच्यासोबत वाईट शब्दप्रयोग केला आणि अश्लील शब्दांचा वापर केला. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 66C (ओळखीची चोरी), 66D (प्रतिरूपणाद्वारे फसवणूक) आणि 84C (गुन्हा करण्याचा प्रयत्न) अंतर्गत FIR नोंदवली आहे.
सुधा मूर्ती कोण आहेत?
सुधा मूर्ती प्रसिद्ध समाजसेविका आणि लेखिका आहेत. सुधा मूर्ती यांनी आठ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्या भारतातील सर्वात मोठ्या ऑटो उत्पादक इंजिनिअरिंग आणि लोकोमोटिव्ह कंपनी टेल्कोमध्ये काम करणाऱ्या पहिल्या महिला इंजिनिअर आहेत.
सायबर गुन्ह्यांचा प्रवाह दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सरकार आणि टेलिकॉम सेवा प्रदाते नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत.

