(लोणावळा)
वर्षाविहारासाठी लोणावळ्यात आलेल्या मद्यधुंद पर्यटकांच्या स्कॉर्पिओने दोन तरुणांना धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री सुमारे ७.४५ वाजता सहारा पुलाजवळ घडली. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी स्कॉर्पिओला आग लावून ती जाळून टाकली.
अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव कार्तिक उल्हास चिंचणकर (वय २०, रा. भैरवनाथनगर, कुसगाव बुद्रुक, लोणावळा) असून, आयान मोहम्मद शेख (वय १७, रा. त्याच परिसरात) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे.
अपघात घडवणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीचा चालक तुलसीराम रामपाल यादव (वय ३२, रा. वडाळा पूर्व, मुंबई) असून, याबाबत अनिल सुर्यकांत चिंचणकर (वय ५३, रा. भैरवनाथनगर) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून आलेले चार पर्यटक स्कॉर्पिओ (क्रमांक UP-80/DC-9000) गाडीतून लोणावळ्यात पर्यटनासाठी आले होते. सहारा पुलाजवळ पोहोचल्यावर मद्यधुंद अवस्थेत त्यांनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, त्यांच्यापैकी एकाने गाडी अत्यंत भरधाव वेगात हॉटेल मिस्टी मेडोजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालवली आणि रस्त्याच्या कडेला सिमेंटच्या कठड्यावर स्कुटीवर बसलेल्या दोघा तरुणांना जोरात धडक दिली.
या धडकेत कार्तिक चिंचणकर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आयान शेख गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकासह तिघांना ताब्यात घेतले आणि जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
मात्र, पोलिस घटनास्थळावरून परतल्यानंतर संतप्त नागरिकांनी स्कॉर्पिओला आग लावली. काही क्षणांतच संपूर्ण गाडी जळून खाक झाली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपाली पाटील करत आहेत.