(संगमेश्वर)
तालुक्यातील देवरुख शहरातील केशवसृष्टी परिसरात एका वृद्ध महिलेच्या घरात ४ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, देवरुख पोलीस तपास करीत आहेत.
नेहा संतोष जोशी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित तरुणीचे नाव समृद्धी संतोष लवटे (२५, रा. कारलेकर गर्दी, खानभाग, सांगली, सध्या रा. देवरुख) असे असून, ती जोशी यांच्या घरात पेंईंग गेस्ट म्हणून राहत होती. ५ ते ६ जूनदरम्यान नेहा जोशी शिबिरासाठी पाध्ये स्कूल येथे गेल्या होत्या. त्या वेळी त्यांच्या घरी फक्त वयोवृद्ध सासू शालिनी जोशी होत्या. शालिनीबरोबर राहण्यासाठी समृद्धी लवटेही घरी होती. मात्र, ६ जून रोजी सकाळी नेहा घरी परतल्यानंतर त्यांना मुख्य दरवाजा अर्धवट उघडलेला दिसला. बेडरूममधील कपाटाचे झडप उघडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
कपाटातील जॅकेट तपासले असता दोन सोन्याच्या पाटल्या गायब असल्याचे उघड झाले. त्यानंतर घरभर शोध घेतला, मात्र दागिने सापडले नाहीत. अखेर १४ ऑगस्ट रोजी जोशी यांनी देवरुख पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. फिर्यादीत समृद्धी लवटेवरच संशय व्यक्त करण्यात आला असून, तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीप्रकरणाचा पुढील तपास देवरुख पोलीस करीत आहेत.

