(रत्नागिरी / प्रतिनिधी)
बस प्रवासादरम्यान अनोळखी चोरट्याने बीसाबी अल्लाबक्ष मकानदार (वय ५०, मुळ ऐनापूर, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर; सध्या रा. परटवणे, ता. रत्नागिरी) यांच्या गळ्यातील १ लाख ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र आणि २८ हजार रुपयांची अंगठी लंपास केली. ही घटना १२ ऑगस्ट रोजी तळेरे ते पाली दरम्यान घडली, अशी माहिती लांजा पोलिस ठाण्यात मिळाली आहे.
बीसाबी यांच्या फिर्यादीनुसार, पणजी येथून रत्नागिरीला प्रवास करत असताना बसमध्ये काळासावळा, उंच, अंगात जॅकेट असलेला इसम त्यांच्या शेजारी बसला होता. तळेरे बसस्थानकावर तो इसम चहा पिण्यासाठी उतरण्याचा आग्रह करत असला, तरी बीसाबी यांनी नकार दिला. काही वेळाने त्याने चहा त्यांच्या हातात आणून दिला आणि त्यातूनच औषध मिसळले गेले. दुपारी १.४५ वाजता बस पुढे निघाली तेव्हा बीसाबी यांना झोप येणे आणि अस्वस्थता जाणवू लागली. शेजारील इसमाकडे फोन करतानाही प्रवासात गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, पाली येथील ग्रामीण रुग्णालयात बीसाबी यांना दाखल करण्यात आले आणि नंतर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांच्या लक्षात आले की गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील अंगठी गायब आहेत.
बीसाबी यांच्या पतींनी चौकशी केली असता, रुग्णालयात दाखल असतानाच मंगळसूत्र व अंगठी हरवले असल्याचे समोर आले. बीसाबी यांचा विश्वास आहे की, हा मुद्देमाल बसमध्ये त्यांच्या शेजारी बसलेल्या इसमाने चोरला. लांजा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून, घटनेची हद्द कणकवली पोलिसांकडे असल्याने तपास त्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

