(संगमेश्वर / एजाज पटेल)
सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला आहे. गावामध्ये नव्याने नेतृत्व उभे राहण्यासाठी इच्छुकांनी मैदानात उतरायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी जुन्या नेतृत्वाला विरोध करत नव्या चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत. परंतु सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावागावांत हौसे, गौसे, भावी सरपंच चांगलेच हवेत असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे मातब्बर पुढाऱ्यांची आतापासूनच कमालीची डोकेदुःखी वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सरपंच आरक्षण निवडीकडे स्थानिक पुढाऱ्यांचे लक्ष लागले होते. संगमेश्वर तालुक्यात ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर झाले. या आरक्षणामुळे काही गावांमध्ये भावी सरपंच होण्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. आरक्षणाने आपल्याच गटाला संधी मिळाल्याचे लक्षात येताच काही गावांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच गावातील जनसंपर्क वाढवण्यास, विकासाच्या मुद्यांवर भर देण्यास व नेहमी प्रमाणे आश्वासनाची बरसात करण्यास सुरुवात केली असून, काही ठिकाणी यासाठी बैठकाही घेण्यात येत आहेत.
ग्रामपंचायत ही गावच्या विकासाची सर्वांत महत्त्वाची यंत्रणा असून, केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना थेट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येतात. त्यामुळे सरपंच पदावर येणाऱ्या व्यक्तीला मोठे अधिकार प्राप्त होतात, हे लक्षात घेऊन अनेक राजकीय कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते सरपंच पदासाठी प्रयत्नशील झाले आहेत.
आरक्षणानुसार उमेदवारांची चाचपणी
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्षांपेक्षा स्थानिक आघाड्यांना अधिक महत्त्व असते. सध्या संपूर्ण ग्रामपंचायतींची सरपंच निवड ही थेट जनतेतून होणार असल्यामुळे त्या गावातील सरपंच आर-क्षणानुसार उमेदवाराची चाचणी सुरू झाली आहे. सरपंचासाठी सक्षम उमेदवार निवडण्यासाठी गावपुढारी कामाला लागले असून जनतेत चांगला जनसंपर्क असलेला उमेदवाराचा पॅनलप्रमुख शोध घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात अनेक तरूण चेहऱ्यांना संधीची आशा आहे.
जनतेतून सरपंच नियुक्तीमुळे मोठी रस्सीखेच
यावेळी प्रथमच सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्यामुळे मोठी रस्सीखेच असणार आहे. आरक्षणानुसार त्या गावातील सर्वसमावेशक नेतृत्वाला संपूर्ण पाच वर्षांचा कालावधी मिळणार आहे. गावातील ग्रामपंचायत सदस्यांना एवढे महत्त्व राहणार नसल्यामुळे अनेक गावांतील ग्रामपंचायतीमधील सदस्यांचा खर्च भावी सरपंचाना करावे लागणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.