(संगमेश्वर / एजाज पटेल)
इतिहास, संस्कृती आणि परंपरेने नटलेलं संगमेश्वर हे नाव उच्चारलं की प्रत्येक संगमेश्वरककरांची मान अभिमानाने उंचावते. या नावाच्या प्रत्येक अक्षरात जणू आपली ओळख सामावलेली आहे. परंतु, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या संगमेश्वर एस.टी. स्थानकावर लावलेल्या फलकावर हेच नाव ‘संगमेश्र्वर’ असे चुकीचे लिहिलेले दिसते. ही चूक केवळ डोळ्यांना चटका देणारीच नाही, तर मनामध्ये अस्वस्थता आणि संताप निर्माण करणारी ठरते.
मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. हा क्षण प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे. परंतु दुसरीकडे, आपल्या अभिमानाचं नावच अधिकृत फलकावर चुकीचं लिहिलेलं असणं ही बाब नक्कीच लाजिरवाणी आहे. स्थानिकांना कदाचित ही चूक लगेच जाणवणार नाही, कारण त्यांचं लक्ष फलकाकडे जात नाही. मात्र, बाहेरून येणारे प्रवासी या स्थानकाचं नाव उत्सुकतेने वाचतात. त्यावेळी ‘संगमेश्वर’ऐवजी मोठ्या अक्षरांत झळकणारा ‘संगमेश्र्वर’ असा शब्द त्यांच्या नजरेत भरतो आणि ते आश्चर्य व्यक्त करत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत नाराजी बोलून दाखवतात.
इतिहासाच्या दृष्टीने संगमेश्वर ही केवळ एक वस्ती किंवा तालुक्याचं नाव नाही. ही ती पवित्र भूमी आहे, जिथे छत्रपती संभाजीराजांनी बलिदान दिलं. कर्णेश्वर, सप्तेश्वर, मार्लेश्वर अशी प्राचीन देवस्थाने, वीरपुरुषांच्या समाधीभूमी आणि संस्कृतीचा वारसा लाभलेल्या या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा ठिकाणाच्या या तालुक्याचे नावात झालेली चूक ही केवळ अक्षरांची चूक नसून, आपल्या अभिमानावरचा आघात आहे.
ही चूक अज्ञानातून झाली की निष्काळजीपणातून हे माहीत नाही; पण चूक ही चूकच असते आणि तिची दुरुस्ती तातडीने होणं गरजेचं आहे. स्थानकावर फलक लावून पंधरवडा उलटून गेला तरी अजूनही ही चूक कायम असल्याने, संगमेश्वर हे अभिमानाचं नाव चुकीच्या पद्धतीने लिहिल्याने फलकावरील ही चूक डोळ्यांना चटका देणारी आणि अनेकांच्या मस्तकात संतापाची ठिणगी पेटवणारी ठरत आहे.

