(संगमेश्वर / एजाज पटेल)
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परचुरी गावात लोकशाहीप्रती जागरूकतेचा एक प्रेरणादायी आणि भावनिक क्षण आज अनुभवायला मिळाला. मतदान हा केवळ हक्क नसून नागरिकांचे कर्तव्य आहे, हे कृतीतून दाखवून देत परचुरी येथील नवविवाहिता प्रियंका भार्गव वेल्ये हिने आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवशी थेट मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्क बजावला.
प्रियंका वेल्ये यांचा विवाह रुपेश खाडे यांच्याशी पारंपरिक आणि उत्साही वातावरणात पार पडला. मंगलाष्टका, वाजत-गाजत झालेला विवाहसोहळा, नातेवाईकांचा जल्लोष आणि शुभेच्छांचा वर्षाव या सर्व आनंदाच्या क्षणांमध्येही प्रियंकाच्या मनात एक विचार ठाम होता, आज मतदानाचा दिवस आहे.
विवाह विधी आटोपताच कोणताही विलंब न करता, नववधूच्या साजातच प्रियंकाने परचुरी शाळा क्रमांक ३ येथील मतदान केंद्र गाठले. हातावर मेहंदी, चेहऱ्यावर नववधूचे तेज आणि मनात लोकशाहीप्रती असलेली जबाबदारी घेऊन तिने मतदान केले. हा क्षण मतदान अधिकारी आणि उपस्थित नागरिकांसाठीही भावूक करणारा ठरला.
“लग्नाचा आनंद मोठा आहे, पण लोकशाहीतील आपले कर्तव्य त्याहून मोठे आहे,” हा संदेश प्रियंकाने आपल्या कृतीतून दिला. तिच्या या निर्णयामुळे मतदान केंद्रावर काही काळ भारलेले वातावरण निर्माण झाले. अनेक मतदारांनी तिला अभिनंदन करत तिच्याकडून प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
विशेष म्हणजे, प्रियंका वेल्ये या परचुरी गणातील शिवसेनेच्या उमेदवार शर्वरी वेल्ये यांच्या नणंद आहेत. राजकीय वातावरण तापलेले असतानाही, नातेसंबंध आणि वैयक्तिक आनंदापलीकडे जाऊन तिने लोकशाहीला दिलेले प्राधान्य नागरिकांच्या मनात ठसले आहे.
लग्नाच्या दिवशीही मतदानाला सर्वोच्च स्थान देत प्रियंकाने जबाबदार नागरिकत्वाचा आदर्श घालून दिला. तिच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावरही हा प्रसंग चर्चेचा विषय ठरला आहे. “प्रत्येक मत महत्त्वाचे आहे” हे विधान तिच्या कृतीतून प्रत्यक्षात उतरले.
हा प्रसंग केवळ परचुरीपुरता मर्यादित न राहता, मतदान टाळणाऱ्या प्रत्येकासाठी आत्मपरीक्षण घडवणारा आहे. लग्न, काम, प्रवास किंवा वेळेअभावी मतदान टाळणाऱ्यांसाठी लग्न मंडपातून मतदान केंद्रापर्यंतचा प्रियंकाचा प्रवास हा लोकशाहीचा खरा विजय ठरला आहे.

