(कोल्हापूर)
शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीने पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवले. मृत विद्यार्थिनीचे नाव गायत्री रेळेकर असून ती मूळची सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथील आहे. तिच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गायत्री भूगोल विभागात पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. रक्षाबंधनासाठी ती 8 ऑगस्ट रोजी गावी गेली होती आणि सोमवारी सकाळीच परतली होती. तीन दिवस गावी गेल्यानंतर ती 11 ऑगस्ट रोजी सकाळी कोल्हापूरला परतली होती. सांगलीहून विद्यापीठाच्या गर्ल्स हॉस्टेल नंबर 1 मध्ये सुखरूप आल्याची माहिती तिने वडिलांना फोनवर दिली होती. गायत्रीच्या वडिलांचे कापडाचे दुकान आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता तिने गावाहून परत आल्यावर ‘मी सुखरूप पोहोचले आहे,’ असा फोन वडिलांना केला होता.
दुपारी वसतिगृहातील तिच्या मैत्रिणी परत आल्या तेव्हा रूमचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने आणि फोन न उचलल्याने संशय आला. खिडकीतून पाहिले असता गायत्रीने ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले.
मैत्रिणींनी तात्काळ रेक्टर आणि सुरक्षारक्षकांना माहिती दिली. सुरक्षारक्षकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. नंतर राजारामपुरी पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी वसतिगृहाकडे धावले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.
दरम्यान, आत्महत्येची बातमी कळताच सांगलीहून गायत्रीचे कुटुंबीय तात्काळ विद्यापीठात दाखल झाले. गायत्रीच्या अकस्मात मृत्यूने विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली असून हॉस्टेलमधील मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. वसतिगृहासमोर नातेवाईक व मैत्रिणींचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

