(मुंबई)
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका होत असल्या तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाकरे युतीने केवळ 6 ते 7 महापालिकांवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिकांमध्येच युती पूर्ण ताकदीने प्रचार करणार आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे युतीचा संयुक्त जाहीरनामा 4 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, 5 जानेवारीला पहिली संयुक्त जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर ठाकरे बंधू प्रचाराच्या मैदानात सक्रियपणे उतरतील.
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू एकत्र प्रचारात
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांची अधिकृत युती झाली असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा केली होती. आता या युतीचा प्रचार ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभांद्वारे केला जाणार आहे. 5 जानेवारी रोजी पहिल्या संयुक्त जाहीर सभेने प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.
मुंबईत एकूण तीन संयुक्त सभा होणार आहेत —
▪️ एक सभा पूर्व उपनगरात
▪️ एक सभा पश्चिम उपनगरात
▪️ आणि मुंबई शहरात अंतिम सभा घेऊन प्रचाराची सांगता केली जाणार आहे
मुंबईसह अन्य शहरांतही संयुक्त सभा
मुंबईव्यतिरिक्त ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथेही ठाकरे युतीच्या संयुक्त सभा आयोजित करण्यात येणार आहेत. यामुळे निवडणुकीपूर्वी मर्यादित पण लक्ष केंद्रीत प्रचारावर ठाकरे युतीचा भर असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, शिवसेना (उबाठा) नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत संयुक्त प्रचाराची रणनीती आणि नियोजनावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

