(नवी दिल्ली)
स्वातंत्र्यदिनाच्या ७९ व्या वर्धापनदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांसाठी महत्त्वाची भेट जाहीर केली. केंद्र सरकारकडून ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’ नावाची नवीन योजना सुरू करण्यात येणार असून, तिच्या माध्यमातून तब्बल ३.५ कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा संकल्प आहे.
या योजनेअंतर्गत खासगी क्षेत्रात पहिली नोकरी सुरू करणाऱ्या तरुण-तरुणींना सरकारकडून थेट १५,००० रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही मदत दोन हप्त्यांमध्ये प्रत्येकी ७,५०० रुपये तरुणांच्या बँक खात्यात जमा होईल.
योजनेचे प्रमुख मुद्दे
- पगार १ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या तरुणांनाच लाभ.
- पहिली नोकरी सुरू करताना ईपीएफओमध्ये नोंदणी आवश्यक.
- सहा महिने नोकरी पूर्ण केल्यानंतर पहिला हप्ता.
- १२ महिने पूर्ण केल्यानंतर व आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर दुसरा हप्ता.
- सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, उत्पादन, सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रांना विशेष प्रोत्साहन.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, “आपण शेतकरी आणि महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. लाखो लाभार्थी त्यांचा फायदा घेत आहेत. आता ही योजना तरुणांसाठी रोजगाराचे नवीन दरवाजे उघडेल आणि खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढवेल.”

