( मुंबई )
शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि ‘केडियानॉमिक्स’ या ट्रेडिंग फर्मचे संस्थापक सुशील केडिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उघडपणे टीका केली होती. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी तत्काळ आक्रमक पवित्रा घेतला आणि वरळीतील विजयी मेळाव्यापूर्वीच केडिया यांचे ऑफिस फोडत निषेध व्यक्त केला.
यातच आज (५ जुलै) वरळी डोम येथे आयोजित विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जवळपास १९ वर्षांनंतर एकत्र मंचावर आले. या ऐतिहासिक मेळाव्यानंतर सुशील केडिया यांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर व्हिडीओ पोस्ट करत राज ठाकरे यांची माफी मागितली आहे.
या व्हिडीओत केडिया म्हणतात, “नमस्कार, माझ्या ट्विटचा अर्थ वेगळा घेतला गेला. मी तणावाखाली असताना ते ट्विट केलं. मराठी न येणाऱ्यांवर होणाऱ्या प्रतिक्रियांमुळे मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झालो आणि भावनिक अतिरेकातून प्रतिक्रिया दिली. मला माझ्या चुकीची जाणीव झाली असून मी ती स्पष्टपणे मान्य करतो आणि माझं वक्तव्य मागे घेतो.”
ते पुढे म्हणाले, “राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे ठाम असून त्यांच्या भूमिकेचे मला कौतुक वाटते. ते नेहमीच माझ्यासाठी एक हिरो राहिले आहेत. मात्र, जेव्हा आपलेच लोक एकमेकांशी भांडतात, तेव्हा मनात गोंधळ निर्माण होतो. त्या क्षणी मी अतिरेकी बोललो, यासाठी मी मनापासून क्षमस्व आहे.”
वादग्रस्त वक्तव्य काय होते?
सुशील केडिया यांनी यापूर्वी ट्वीट करत लिहिले होते —
“नोंद घ्या राज ठाकरे, मी ३० वर्षांपासून मुंबईत राहतो तरी मला मराठी येत नाही. तुमचं गैरवर्तन पाहून आता मी प्रतिज्ञा करतो की, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी भाषेचे कैवारी म्हणून वावरत आहेत, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचं ते करा…”
या वक्तव्यामुळे मराठीप्रेमी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला होता.
सुशील केडिया कोण आहेत?
सुशील केडिया हे ‘केडियानॉमिक्स’ नावाच्या रिसर्च आणि ट्रेडिंग सल्लागार संस्थेचे संस्थापक आहेत. ही फर्म संपत्ती नियोजन, आर्थिक विश्लेषण आणि गुंतवणूक सल्ला देते. शेअर बाजारातील २० वर्षांहून अधिक अनुभव असल्याचा केडिया यांचा दावा आहे.