(पुणे)
ऐन गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात पुण्यात टोळी युद्धाचा भडका उडाला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपी गणेश कुमकर याचा मुलगा गोविंद कुमकर याची शुक्रवारी संध्याकाळी नाना पेठ येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली आहे. नाना पेठ येथील हमाल तालीमजवळ ही घटना घडली. गोविंद कुमकरवर इमारतीच्या पार्किंगमध्ये अज्ञातांनी चार गोळ्या झाडल्या, यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही हत्या ‘खून का बदला खून’ या टोळीवादी प्रवृत्तीचंच उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.
“साधारण पावणे आठच्या सुमारास घटना घडली. आयुष क्लासमधून परत येत होता. तो क्लासमधून घरी परत आल्यावर त्याच्या घराखाली पार्किंगची जागा असलेल्या बेसमेंटमध्ये त्याच्यावर गोळीबार झाला. दोन अज्ञात आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला”, असं उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
१ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यात आला होता. जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचं समोर आलं होतं. या खुनाच्या कटात वनराज यांची बहीण संजीवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि प्रकाश कोमकर यांनी सोमनाथ गायकवाड याला हाताशी धरल्याचे उघड झाले. या प्रकरणी एकूण २१ आरोपींना अटक करण्यात आली होती.
आरोपींच्या घराची रेकी
वनराज यांच्या खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या साथीदारांच्या आंबेगाव पठार परिसरातील घरांची रेकी केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दत्ता बाळू काळे याला अटक केली होती. तसेच कृष्णा आंदेकर, यश मोहिते, अमन पठाण, यश पाटील, सुजल मिरगू, अमित पाटोळे आणि स्वराज वाडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या तीन महिन्यांपासून यश मोहिते हा आंदेकर टोळीच्या सूचनेनुसार आरोपींच्या घरांची रेकी करत होता. त्यासाठी त्याला कृष्णा आंदेकरकडून पाच हजार रुपये मिळाले होते. ३० ऑगस्ट रोजी दत्ता काळे रेकी करताना पोलिसांच्या हाती लागला आणि आंदेकर टोळी सूडाच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र टोळीच्या निशाण्यावर कोण आहे, हे समजू शकले नव्हते. शेवटी, गोविंद कुमकर याचा खून करून आंदेकर टोळीने आपला संदेश दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

