(मुंबई)
राज्यातील वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली असून, ही नवीन मुदत आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत असणार आहे. त्यामुळे जुन्या वाहनांचे मालक सध्या मोठ्या दंड किंवा कारवाईपासून वाचणार आहेत. ही मुदत सरकारने याआधी तीन वेळा वाढवली होती, सुरुवातीला मार्च, नंतर एप्रिल अखेर, मग जून अखेर आणि त्यानंतर १५ ऑगस्ट अशी ही प्रक्रिया होती. आता ही मुदतवाढ साडेतीन महिन्यांसाठी करण्यात आली आहे.
राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी गुरुवारी संध्याकाळी परिपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली. या परिपत्रकानुसार, सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (RTO) काही महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात, HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर काही प्रकारच्या सेवांवर निर्बंध घालण्याचे निर्देश आहेत. यामध्ये वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, हायपोथेकेशन जोडणे किंवा काढून टाकणे यांसारख्या कामांचा समावेश आहे. तसेच RTO कार्यालयांच्या फ्लाइंग स्क्वॉडना जप्त केलेली वाहने HSRP बसविल्याशिवाय परत न देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, अशा वाहनांची पुन्हा नोंदणी, त्यात बदल करणे, परवाना नुतनीकरण आदी कामेही थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार, HSRP नंबर प्लेटसाठी आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. या कालावधीत सर्व वाहनधारकांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन अपॉइंटमेंट घ्यावी आणि नंबर प्लेट बसवून घ्यावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या वाहनधारकांवर १ डिसेंबर २०२५ पासून कडक कारवाई करण्यात येणार आहे. शासनाने स्पष्ट केलं आहे की, या तारखेनंतर HSRP नसलेल्या किंवा अपॉइंटमेंट न घेतलेल्या वाहनांवर भरारी पथकांद्वारे थेट कारवाई केली जाईल, जी दंडात्मक किंवा कायदेशीर स्वरूपाची असू शकते.
उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट ही बनावट नंबर प्लेट्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही प्लेट खास प्रकारच्या सामग्रीपासून बनवलेली असते, तिच्यावर लेझर कोड असतो आणि ती वाहनाशी कायमस्वरूपी जोडलेली असते, ज्यामुळे चोरी किंवा गैरवापर थांबवण्यास मदत होते.
वाहनधारकांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शासनाच्या नियमानुसार आपले वाहन अद्ययावत करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी ३० नोव्हेंबरपूर्वीच अपॉइंटमेंट घेऊन HSRP बसवावी, अन्यथा डिसेंबरपासून होणाऱ्या कारवाईला सामोरे जावं लागू शकतं.

