(लांजा -रत्नागिरी/ प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा लांजा अंतर्गत ग्रामशाखा शिपोशी येथे श्रावण पौर्णिमेनिमित्त शनिवारी (दि. ९ ऑगस्ट) पारंपरिक आणि धार्मिक वातावरणात वर्षावास कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला आयु. मिलिंद कांबळे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी तथागत भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा व मुर्तींना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर बुद्ध विहारात उपस्थित उपासक-उपासिकांनी आदर्शांना पंचांग प्रणाम केला व त्रिशरण, पंचशील ग्रहणासह सामुदायिक सूत्रपठणात सहभाग घेतला. कार्यक्रमात प्रवचनकार विजय जाधव यांनी महामंगल सुत्ताच्या आधारे ‘मानवाचे मंगल कशात आहे’ याविषयी मनोगत व्यक्त केले. “प्रत्येकाने मंगल सुत्त समजून घेऊन दैनंदिन जीवनात आचरण केल्यास समाजात सुख-समाधान नांदेल व वैयक्तिक कल्याण निश्चित होईल,” असे जाधव यांनी सांगितले. यावेळी आर. बी. कांबळे (अध्यक्ष, लांजा), दिनेश कांबळे (सरचिटणीस, लांजा), अरविंद जाधव (बौद्धाचार्य) यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास आदेश जाधव, मोहन धनावडे, अशोक पवार, सिद्धार्थ पवार, यशवंत कांबळे (सैनिक), सचिन जाधव, शंकर कांबळे, रेश्मा कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक-उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर कांबळे यांनी केले. शरणत्तय वंदनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

