(रत्नागिरी / प्रतिनिधी)
टाईल्स फिटिंगचे काम करणाऱ्या एका कामगाराचा लिफ्ट अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोतवडे बाजारपेठ परिसरात घडली. ही घटना दि.२३ एप्रिल २०२५ रोजी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
रमेशकुमार बनसीनाथ योगी (वय ३८ वर्षे, रा. गहकनीत, तालुका श्रीमाधूपूर, जिल्हा सीकर, राजस्थान) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रमेशकुमार हे मागील अनेक वर्षांपासून टाईल्स फिटिंगचे काम करत होते. घटनास्थळी ते अनिल बालकृष्ण घईसास यांच्या इमारतीचे काम करत असताना, कामासाठी वापरण्यात येणारी लिफ्ट अचानक तुटली. त्यामुळे रमेशकुमार लिफ्टसह चौथ्या मजल्यावरून थेट खाली पडले व गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पीटल रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.