(रत्नागिरी)
चेसमेन रत्नागिरी संघटनेचे संस्थापक कै. दिलीप टिकेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेची सुरुवात रत्नागिरीतील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमित झाली. रत्नागिरीच्या प्रथम मानांकित यश गोगटे, द्वितीय मानांकित सौरिश कशेळकर यांच्या सहित चिपळूण, मंडणगड, देवरुख, संगमेश्वर येथील १३ फिडे मानांकन प्राप्त व एकूण ५० बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन चेसमेन रत्नागिरी संघटनेचे अध्यक्ष व प्रतिथयश उद्योजक श्री. प्रसन्न आंबूलकर यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी चेसमेनचे पदाधिकारी सुभाष शिरधनकर, सुहास कामतेकर, मॅजिक स्क्वेअरचे चैतन्य भिडे, पंच विवेक सोहनी आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरीतील बाल बुद्धिबळपटू आयुष रायकर याचे सोबत पटावर प्रतिकात्मक चाली रचून श्री. आंबूलकर यांनी स्पर्धेचा औपचारिक शुभारंभ केला.

जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या नियमांनुसार स्विस लीग पद्धतीने जलद स्पर्धेच्या सात व अतिजलद स्पर्धेच्या आठ फेऱ्या घेण्यात येतील. जलद स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीअखेर तेजस्वर कांबळे, श्रीहास नारकर, वरद पेठे, सौरिश कशेळकर व यश गोगटे असे पाच जण प्रत्येकी ३ गुणांसह संयुक्त रित्या आघाडीवर होते.
कै. दिलीप टिकेकर यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने २५ वर्षांपूर्वी चेसमेनची स्थापना करून रत्नागिरी शहरात बुद्धिबळाची संघटनात्मक सुरुवात केली. त्यांच्या नावे मॅजिक रत्नागिरीत बुद्धिबळाचे वाचनालय देखील चालविण्यात येते. या वाचनालयात बुद्धिबळ खेळावरील दुर्मिळ ग्रंथसंपदा बुद्धिबळप्रेमींना उपलब्ध आहे.

