(खेड)
बालपणापासून मुलांच्या संस्कारासाठी आई-वडील हे पहिले गुरू असतात, पण मुलांना घडवणारे दुसरे मूर्तिमंत शिक्षक असतात. श्री. ज्ञानोबा सोमवंशी सर असेच आदर्श शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रिय गुरू होते. त्यांनी ३९ वर्षांच्या दीर्घ सेवाकाळानंतर ३१ जुलै २०२५ रोजी शासकीय सेवानिवृत्ती घेतली. परंतु शिक्षक कधीही निवृत्त होत नाहीत, कारण ते आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानदानाचा दीप उजळवित राहतात, आणि सोमवंशी सर हेच आदर्श ज्ञानदान करणारे शिक्षक आहेत.
प्रदीर्घसेवा आणि सामाजिक बांधिलकी
ज्ञानोबा सोमवंशी सर यांनी एकूण ३१ वर्ष धाराशिव जिल्ह्यात शिक्षक म्हणून सेवा बजावली. ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, धाराशिवचे पदाधिकारीही होते. २०१७ मध्ये जिल्हा बदलीने ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील नांदिवली केळेवाडी येथील शाळेत रुजू झाले. त्यांनी गावातील पालकांमध्ये आणि संपूर्ण समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. गणित विषयात त्यांचा विशेष हातखंडा होता. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षांसाठी तयार करून यशस्वी केले.
विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची समजूत घेऊन, आर्थिक मदतीसह त्यांचे गुण ओळखून योग्य मार्गदर्शन करणारी कामगिरीही त्यांनी मनोमन केली. अभ्यासाबरोबरच मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी आणि सामाजिक कौशल्य वाढीसाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले. शाळेतील प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन आणि सुसूत्र आयोजन करण्याची जबाबदारी त्यांनी नेहमीच समर्थपणे पार पाडली. त्यांच्या कल्पकतेमुळे शाळेतील शैक्षणिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम नेहमी यशस्वी ठरत असत.
व्यावसायिक कौशल्ये आणि संघटनात्मक योगदान
शिक्षणाबरोबरच, सोमवंशी सर हे संगणक कौशल्यात पारंगत असून, मराठी व इंग्रजी टायपिंग सहजपणे करीत असत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीमध्येही ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्यरत होते. आंबवली विभाग हा शिक्षक समितीचा बालेकिल्ला असल्याने, तो बालेकिल्लाच राहावा यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. संघटनेच्या सर्व कार्यक्रमांना त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि मार्गदर्शनही केले.
सेवापुर्ती सोहळा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तालुका शाखा खेड यांच्या वतीने तालुका स्कूल खेड येथे आयोजित केलेल्या सेवापुर्ती सोहळ्याला शिक्षक नेते, संघटना पदाधिकारी आणि सहकारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वागत नवनीत घडशी यांनी केले, तर आभार शैलेश पराडकर यांनी मानले.
शिक्षकी पेशा ही केवळ नोकरी नसून, समाज घडवण्याचा एक पवित्र मार्ग आहे, असे समजून ज्ञानदान करणारा, समाजाला समर्पित सेवक शिक्षक ज्ञानोबा सोमवंशी सर यांची ओळख ठरली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांना उत्तम आरोग्य लाभो, आणि त्यांच्या हातून पुढेही ज्ञानदानाचे कार्य सुरू राहो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना सर्व शिक्षक आणि उपस्थितांमार्फत करण्यात आली.

