(ठाणे / वृत्तसंस्था)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळा पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री त्यांच्या कार्यालयात गोळीबार करून हत्या करण्यात आली. त्यांच्यावर एकूण सात राऊंड फायर करण्यात आले असून, त्यातील तीन गोळ्या त्यांना लागल्या. या घटनेनंतर पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाणे महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या (शिंदे) नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्यासह त्यांचे पती राजेंद्र शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात पुरवणी एफआयआरमध्ये पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
राम पूर्णेकर यांनी केलेल्या आरोपानुसार, निवडणुकीच्या काळात मीनाक्षी शिंदे यांनी त्यांच्या वडिलांना धमकी दिली होती. त्यानंतरही प्रदीप पूर्णेकर यांनी मीनाक्षी शिंदे यांच्याविरोधात काही आरोप केले होते, असा दावा राम पूर्णेकर यांनी केला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीचाही तपास करावा, तसेच मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी पूर्णेकर कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
राम पूर्णेकर यांनी दावा केला की, “दीड वर्षांपूर्वी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे या दोघांची नावे माझ्या वडिलांनी मला आधीच सांगितली होती. हे लोक मला मारण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांनी माझ्या वडिलांना फोन करून मला धमकीही दिली होती. आता चार दिवसांपूर्वी, म्हणजेच गणपती विसर्जनाच्या एक दिवस आधी, राजेंद्र शिंदे आणि हल्लेखोर यांची एक मीटिंग झाली होती. माझ्यासोबत आणखी दोन जण होते. त्यांनी त्या दोघांना पाहिले होते,” असा दावा राम पूर्णेकर यांनी केला. दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांचे भाऊ आणि माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर यांनीही हा सर्व प्रकार गणेशोत्सवापासून सुरू असल्याचा दावा केला आहे.
मात्र, मीनाक्षी शिंदे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. आपल्या प्रभागात घडलेली ही दुर्दैवी घटना असल्याचे सांगत त्या म्हणाल्या, “ही माझ्या प्रभागामध्ये झालेली दुखःद घटना आहे. पण अशा प्रकारे कोणीही येऊन माझे नाव त्यामध्ये गोवण ही खरंतर चुकीची बाब आहे. पुरावे काय आहेत ते पोलिस शोधत आहेत. चौकशी करत आहेत. मला असं वाटतं की जे काही व्हायचं ते चौकशीअंती पोलिस प्रशासन या सगळ्या गोष्टींची माहिती घेईल.” मीनाक्षी शिंदे यांनी त्यांच्यासह त्यांच्या पतीवर केले जाणारे आरोप बिनबुडाचे असल्याचेही म्हटले आहे.
ठाण्यातील या हत्येनंतर बुधवारी दिवसभर त्याचे राजकीय पडसाद उमटले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी ठाण्यात भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागे मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे असल्याचे आरोप केले. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मीनाक्षी शिंदे यांनी, “माझ्या घरी कट शिजला असं म्हणत असतील तर माझ्या घरी ते कधी होते, किंवा त्यांनी कधी याबद्दल माझ्या घरात बघितलं याचा पुरावा त्यांना द्यावा लागेल ना. बोलायचं म्हणून काहीही बोलायचं,” असे म्हटले.
पुढे त्या म्हणाल्या, “सध्या लोकांचा रोष आहे. कारण की त्या घरातला मुलगा गेला आहे. त्या रागामध्ये ते बोलत असतील पण मला असं वाटतं की, अशा प्रकारचे आरोप करण्यापूर्वी त्यांनी विचार केला पाहिजे की, प्रत्येकवेळी काहीही झालं की शिंदे गटातील मिनाक्षी शिंदे किंवा माझ्या पतीचं नाव वापरुन राजकारण करायचं. सध्या पूर्णेकरांची हत्या झाली आहे. त्याचं राजकारण करायला आदित्य आणि संजय राऊत येतात ही दुर्दैवी बाब आहे.”
दरम्यान, कापूरबावडी पोलिसांनी या प्रकरणात चारपैकी एका आरोपीला अटक केल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी माध्यमांना दिली. राजकीय आणि सामाजिक कारणावरून झालेल्या वादातून प्रदीप पूर्णेकर यांची हत्या करण्यात आल्याची कबुली अटक केलेल्या आरोपीने दिल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच इतर आरोपींना पकडले जाईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
पूर्णेकर हत्या प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिस तपासाला महत्त्व प्राप्त झाले असून, मीनाक्षी शिंदे यांनीही या प्रकरणातील सत्य पोलिसांच्या चौकशीतूनच समोर येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ नाव घेऊन आरोप करता येतात; मात्र ते सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल.


