(चिपळूण/ रत्नागिरी)
चिपळूण पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ विनापरवानगी जमाव जमवून धरणे आंदोलन आणि निदर्शने केल्याप्रकरणी महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह २५ ते ३० जणांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या वाजवी आदेश आणि नोटिशीचे उल्लंघन करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ही घटना २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.४५ ते दुपारी १२.४५ या वेळेत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या नावाचे फलक लावून आरोपी क्रमांक १ ते ५ यांच्यासह सुमारे २५ ते ३० जण चिपळूण पोलीस ठाण्याच्या डाव्या बाजूकडील गेट क्रमांक २ येथे मुख्य रस्त्यालगत एकत्र जमले. यावेळी कोणतीही परवानगी न घेता धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. तसेच पोलिसांविरोधात मोठ्या आवाजात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्याने सार्वजनिक शांतता भंग झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अनिकेत साळवी (वय ३४, रा. खेर्डी, चिपळूण), मुजफ्फर ऊर्फ राजेश मल्लाजी (वय ४२, रा. सावर्डे, उत्तर जिल्हाध्यक्ष), ॲड. प्रसाद करंदीकर (वय ४०, अध्यक्ष, महाराष्ट्र लोकाधिकार समिती), योगेश भारत वाघमारे (वय ४६, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र लोकाधिकार समिती) आणि अनंत शिंदे (वय ३६, रा. अलोरे, जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी) यांच्यासह अन्य २५ ते ३० जणांचा समावेश आहे.
याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल संकेत विजय गरव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, १८९, १९० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११०/११७ आणि ११२/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.


