(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
विजयादशमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या उभारणीसाठी आत्मनिर्भरता, दृढनिश्चय, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांचे महत्त्व अधोरेखित केले. मंगळवारी (२० ऑक्टोबर) पूर्व दिल्लीतील आयपी एक्सटेंशन येथील उत्सव मैदानावर श्री रामलीला समिती इंद्रप्रस्थतर्फे आयोजित रामलीला कार्यक्रमात ते सहभागी झाले. यावेळी भगवान श्रीराम, माता सीता आणि बजरंगबली यांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी देशवासीयांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. भाषणापूर्वी त्यांनी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले.
भगवान श्रीरामांच्या आदर्शांचा उल्लेख करत मोदी यांनी रामराज्याची संकल्पना स्पष्ट केली. त्यांच्या मते, रामराज्य म्हणजे कोणताही भेदभाव नसलेली, प्रत्येकाला न्याय मिळणारी आणि सर्वांना सन्मान व संधी देणारी व्यवस्था होय. अशा व्यवस्थेत सत्तेचा उद्देश केवळ राज्य करणे नसून जनकल्याण साधणे हा असतो. त्यामुळे जनतेला जनार्दन मानून ‘नागरिक देवो भव’ या मंत्रानुसार पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
देशभरात आयोजित होणाऱ्या रामलीला या भगवान श्रीरामांचे आदर्श आणि शिकवण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या परंपरेचे प्रतीक असल्याचे मोदी म्हणाले. आज देशाच्या कानाकोपऱ्यात, गावागावांत आणि शहरांमध्ये श्रीरामांची भक्ती व त्यांच्या विचारांचा जयघोष होत आहे. संपूर्ण देश रामलीलेच्या उत्साहात सहभागी झाला असून, विजयादशमी हा केवळ उत्सव नसून भारतीय संस्कृतीच्या जीवनप्रवाहाचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. अधर्मावर धर्माचा आणि असत्यावर सत्याचा विजय हा या उत्सवाचा मुख्य संदेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
भगवान श्रीरामांची हजारो वर्षांपासून पूजा केली जाते, ती केवळ त्यांनी रावणाचा वध केला म्हणून नाही, तर त्यांनी मानवतेसमोर ठेवलेल्या अतुलनीय आदर्शांमुळेही आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले. जुलूम आणि दहशतीच्या अंताची घोषणा करणारी तसेच सत्याच्या विजयावरील विश्वास दृढ करणारी रामलीलेची परंपरा भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करते, असे ते म्हणाले.
श्रीरामांच्या जीवनातील प्रसंगांचा दाखला देत मोदी यांनी कर्तव्यनिष्ठेचा संदेश दिला. राजा होण्याची संधी मिळाल्याने श्रीराम अत्यानंदित झाले नाहीत आणि वनवासाला जावे लागल्याने खचूनही गेले नाहीत. अनेक अडचणींचा सामना करूनही त्यांनी धर्माचे पालन केले आणि सत्याची स्थापना केली. परिस्थिती कोणतीही असली, तरी व्यक्तीने आपली तत्त्वे आणि कर्तव्यांपासून विचलित होऊ नये, ही शिकवण त्यांच्या जीवनातून मिळते, असे मोदी म्हणाले.
संकटे आणि आव्हानांचा सामना करताना दुसऱ्यांवर अवलंबून राहून वाट पाहण्याऐवजी स्वतःची क्षमता ओळखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या साधनांवर विश्वास ठेवून दृढनिश्चयाचे सामर्थ्यात रूपांतर करावे आणि कठोर परिश्रमातून समस्यांवर मार्ग काढावा, असे आवाहन त्यांनी केले. विकसित भारताची उभारणी आणि आत्मनिर्भरता प्राप्त करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठीही हाच मार्ग महत्त्वाचा असल्याचे मोदी यांनी नमूद केले.
या विजयादशमी कार्यक्रमाला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमस्थळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.


