(मुंबई)
भारतीय क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा आणि उदयोन्मुख क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर साखरपुड्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोक हिच्यासोबत नुकताच मुंबईतील एका खाजगी समारंभात पार पडला.
साखरपुड्यानंतर अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोकच्या लग्नाची तयारीही लवकरच सुरू होणार असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातं. दोन्ही कुटुंबांतून या नव्या नात्याचा आनंद साजरा केला जात आहे. सानिया ही एका सुसंस्कृत, व्यावसायिक कुटुंबातील मुलगी असून तिचं शिक्षण आणि करिअरविषयक वाटचाल देखील सकारात्मक दिशेने सुरू आहे.
क्रिकेटच्या मैदानावर अजून आपलं स्थान पक्कं करण्यासाठी अर्जुन प्रयत्नशील आहे. वडिलांच्या नावाची जबाबदारी आणि अपेक्षांचं ओझं असलं, तरी अर्जुन स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. IPLमध्ये संधी न मिळाल्यामुळे त्याची कामगिरी अपूर्ण वाटली तरी स्थानिक क्रिकेटमधील त्याच्या कामात सुधारणा होत आहे.

यंदाच्या हंगामात अर्जुनला अधिक संधी मिळतील, अशी चाहत्यांना आशा आहे. गोव्याच्या संघातून त्याने काही चांगल्या कामगिरी केल्या असून, अष्टपैलू खेळाडू म्हणून तो संघासाठी महत्त्वाचा ठरतो आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज आणि गरजेवेळी फलंदाजी करणारा अर्जुन, भविष्यात टीम इंडियासाठी देखील उपयोगी ठरू शकतो, असं क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.
अर्जुन तेंडुलकरने 17 फर्स्ट क्लास, 18 लिस्ट ए आणि 24 टी20 सामने खेळले आहेत. अर्जुनने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 33.51 च्या सरासरीने 37 विकेट घेतल्या आहेत. तर 23.13 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहे. दुसरीकडे, लिस्ट ए क्रिकेटमध्ये अर्जुन तेंडुलकरने 25 विकेट घेतल्या आहे. यावेळी त्याची सरासरी ही 31.2 इतकी आहे. तर 17 च्या सरासरीने 102 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये 25.07 च्या सरासरीने 27 विकेट घेतल्या. तसेच 13.22 च्या सरासरीने 119 धावा केल्या आहेत.
दुसरीकडे, तेंडुलकर कुटुंब आणि घई कुटुंब यांचं हे नवं नातं सामाजिक आणि व्यावसायिक पातळीवरही लक्षवेधी ठरत आहे. दोन्ही कुटुंबांची प्रतिष्ठा आणि सार्वजनिक ओळख पाहता, अर्जुन आणि सानियाच्या विवाह सोहळ्याची अनेकांना उत्सुकता आहे. साखरपुडा जरी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला असला, तरी तो प्रसारमाध्यमांपासून लपवता आला नाही. सोशल मीडियावर दोघांचे काही फोटोही व्हायरल झाले असून, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
अर्जुन तेंडुलकर आता एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे, एका बाजूला वैयक्तिक आयुष्यातील स्थिरता आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेटमधील अनिश्चितता. मात्र, सचिनसारख्या वडिलांचा पाठिंबा आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असेल, तर तो स्वतःचा वेगळा ठसा उमटवेल, अशी अपेक्षा त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आहे.

