(रत्नागिरी)
पश्चिम बंगाल येथील एका कामगाराचा रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी (दि. १५ डिसेंबर) रात्री ८.१७ वाजता आकस्मिक मृत्यू झाला. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम महादेव अधिकारी (वय ५८, मूळ रा. ता. राणाघाट, जि. नदिया, पश्चिम बंगाल; सध्या रा. रत्नागिरी) असे मृत कामगाराचे नाव आहे. राम अधिकारी हे रत्नागिरीतील बालाजी इंजिनिअरिंग वर्क्स या कंपनीकडे सेंट्रिंगचे काम करत होते.
दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास काम सुरू असताना इमारतीवरून कच्च्या सिमेंटचे मटेरियल खाली टाकण्यात येत होते. यावेळी ते चुकून राम अधिकारी यांच्या डोक्यावर पडल्याने त्यांच्या कपाळाला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले होते.
सीपीआर रुग्णालयात उपचार घेऊन डिस्चार्ज मिळाल्यानंतर राम अधिकारी पुन्हा रत्नागिरीत परतले होते आणि आपल्या खोलीत विश्रांती घेत होते. दरम्यान, सोमवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांचे सहकारी कामावरून परत आल्यानंतर राम अधिकारी खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर रात्री ८.१७ वाजता मृत घोषित केले.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

