(राजापूर)
राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेत दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री लागलेल्या आगीत राजेंद्र पावसकर यांच्या मालकीच्या व्यापारी इमारतीचे आणि त्यामधील व्यवसायिकांचे एकूण ₹26,59,455 इतके नुकसान झाल्याचे महसूल प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निवासी नायब तहसीलदार श्री. सरफरे व तलाठी संदीप कोकरे यांनी तातडीने पंचनामा करून ही माहिती दिली.
ही इमारत धाऊलवल्ली येथील श्री. पावसकर यांची असून, त्यात विविध प्रकारची एकूण सात दुकाने होती. शनिवारी रात्री अचानक आग लागली आणि काही मिनिटांत ती भयावह रूप धारण करत मोठ्या ज्वाळांमध्ये बदलली. ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, मात्र तोपर्यंत दुकाने आणि त्यातील साहित्य जळून खाक झाले होते.
महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार:
इमारतीच्या बांधकामाचे नुकसान: ₹8,50,000
व्यवसायिकांचे एकूण नुकसान: ₹18,09,455
यात खालील दुकानदारांचा समावेश आहे:
प्रसाद पाखरे – फोटो स्टुडिओ
केदार ठाकूर – कापड व प्लास्टिक दुकान
विनोद शेलार – चायनीज सेंटर
प्रदीप मयेकर – टेलरिंग दुकान
निकीता गोसावी – ब्युटी पार्लर
नारायण गोसावी, दिगंबर गिजम – हॉटेल व्यवसाय
या घटनेतील नुकसानग्रस्तांना सध्या शासनाकडून मदतीची प्रतिक्षा आहे.
राजन साळवी यांनी केली पाहणी, मदतीचे आश्वासन

या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून माहिती घेतली होती. नियोजित कामामुळे जिल्ह्याबाहेर असतानाही सोमवारी सकाळी त्यांनी नाटे येथे भेट देत आगीमुळे नुकसान झालेल्या दुकानदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. शासनाच्या माध्यमातून शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अशा प्रसंगी सर्वांनी एकत्र राहून धीर ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या भेटीदरम्यान नाटे सरपंच संदीप बांदकर, माजी उपविभागप्रमुख संतोष चव्हाण, महिला पदाधिकारी मनाली करंजकर, साखरीनाटे सरपंच गुलजार ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य रचना खांबल, श्रुतिका बांदकर, भाजपा उपसंपर्कप्रमुख सचिन बांदकर, मधुकर देवरुखकर, शाखाप्रमुख सिद्धेश थळेश्री, निळकंठ थळेश्री, पुंडलिक गोळपकर, संजयजी बांदकर, राजेश पावसकर, अलमिनाब मस्कर, जमीया पावसकर, आशीयाना गोवळकर उपस्थित होते.

