(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बुधवारी सकाळी ११ वाजता स्टेट बँक ऑफ इंडिया, देवरूख शाखा येथे ‘कृषी विकास व शेतकरी प्रगती कार्यशाळा’ हा मसाला पिके विशेष शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे आयोजन स्टेट बँक ऑफ इंडिया व स्पायसेस बोर्ड ऑफ इंडिया तसेच संगमेश्वर तालुका ऍग्रोस्टार फार्मफ्रेश शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, शेतकऱ्यांना शासनाच्या योजना आणि बँकिंग संधींचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा यामागचा उद्देश आहे.
या कार्यक्रमात जिल्हा प्रबंधक नांबाई, रत्नागिरी श्री. महेंद्र टिक्केर, बँकेचे तांत्रिक व प्रादेशिक व्यवस्थापक, देवरूख शाखा व्यवस्थापक तसेच स्पायसेस बोर्ड ऑफ इंडिया, नवी मुंबईचे प्रतिनिधी ऍग्रोस्टार फार्मफ्रेश कम्पनी अध्यक्ष, सर्व संचालक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यात केंद्र व राज्य शासनाच्या कृषी क्षेत्रातील विविध योजना व सबसिडी (वैयक्तिक, समूह व एफपीसीसाठी), किसान क्रेडिट कार्डची सविस्तर माहिती व तातडीने पूर्तता, हळद, मिरची व अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांसाठी लागवड ते विपणनपर्यंत मार्गदर्शन, बँक व शासकीय योजनांचा समन्वय साधून खेळते भांडवल उपलब्ध करण्याचे पर्याय,
शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) व समूहांसाठी विशेष संधी, स्पायसेस बोर्ड ऑफ इंडिया तर्फे हळद आणि मिरचीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, प्रक्रिया तंत्रज्ञान आणि बाजारपेठ उपलब्धतेबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मसाला पिकांमध्ये नव्या व्यवसायिक संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या मुद्यांवर विशेष चर्चा होणार आहे. आयोजकांनी सर्व शेतकरी बंधू-भगिनींना तसेच तालुक्यातील इच्छुकांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. “ही संधी एकदाच येते; शासन, बँक आणि तज्ञ सर्व एका मंचावर असणार आहेत. तुमच्या शेतीच्या प्रगतीचा नवा मार्ग इथूनच सुरू होऊ शकतो,” असे आयोजकांनी सांगितले.

