( संगमेश्वर / प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्यातील अकरा कनिष्ठ महाविद्यालयांचे वेतन हे गेली ३महिने उशिराने होत आहे. या अकरा कॉलेजचा असलेली शासकीय तांत्रिक अडचण व येणारा अपुरा निधी यामुळे या कॉलेजना याचा फटका बसला आहे.ही बाब सातत्याने आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शासन स्तरावर मांडली आहे.किंबहुना या अकरा कॉलेज चे पगार होण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना गेले तीन महिने प्रत्येकवेळी पाठपुरावा करावा लागला आहे. यावर शिक्षण संचालक कार्यालय पुणे व शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांचे कडून कोणतीच कायम दुरुस्ती व सुधारणा केली जात नसल्याने कोकण विभागीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आक्रमक झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील या अकरा कनिष्ठ महाविद्यालयांचा प्रश्न तात्काळ मिटवा नाहीतर २३ फेब्रुवारी रोजी सुरु होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, हा विषय लावून धरणार असल्याचे आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले.याविषयीचा भूमिका त्यांनी शिक्षण संचालक कार्यालय पुणे यांना ठणकावून सांगितली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ॲड पी आर नामजोशी कनिष्ठ महाविद्यालय माखजन (संगमेश्वर),गोडे दाते कनिष्ठ महाविद्यालय(राजापूर)
न्यू इंग्लिश स्कूल अँड तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय (लांजा)
आठल्ये,सप्रे, पित्रे महाविद्यालय (देवरुख), न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कसबा (संगमेश्वर), डॉ. तानाजीराव चोरगे कनिष्ठ शास्त्र महाविद्यालय, मांडकी पालवण(चिपळूण), बाबाराम पर्शराम कदम ज्युनिअर कॉलेज जाकादेवी(रत्नागिरी) रा.सी बेर्डे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज साटवली(लांजा), शृंगारि उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शृंगारतळी(गुहागर), मोहन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आकले(चिपळूण), श्री देव गोपालकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर & ज्युनिअर कॉलेज, (गुहागर) आदी कॉलेज ला याचा फटका बसत आहे.
संबंधित कॉलेजची पगारबिले फॉरवर्ड केल्यावर वेतन अधीक्षक रत्नागिरीच्या लॉगिन ला नं जाता थेट, कोल्हापूर उपसंचालक कार्यालयाच्या लॉगिन ला जात आहेत. ही तांत्रिक बाब शासकीय स्तरावरून होणे अपेक्षित होते. परंतु गेले तीन महिने याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.कोल्हापूर उपसंचालक स्तरावर गेलेली बिले पुन्हा पास झाल्यावर ती मुख्याध्यापक लॉगिन ला येतात व पुन्हा फॉरवर्ड केली की वेतन अधीक्षक रत्नागिरी यांचेकडे जातात. यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे कोल्हापूर उपसंचालक कार्यालयात गेलेली बिले त्याठिकाणी पास करून तात्काळ परत पाठवणे अपेक्षित आहे. परंतु मुख्याध्यापक लॉगिन वरून कोल्हापूरला गेलेली बिले पास करून पाठवण्यासाठी थेट शिक्षकांना खेटे मारावे लागत आहेत ही शोकांतिका आहे.खर तर शासकीय तांत्रिक अडचण असून देखील शिक्षकांना करा करा असे सतत जाऊन सांगावे लागत आहे. यामुळे शिक्षक वर्गातून संतापाची लाट आहे.
विलंबाने कोल्हापूरहून पास होऊन आलेली बिले पुन्हा रत्नागिरी वेतन अधीक्षकांकडे जाईपर्यंत लेखाशीर्ष ०५११ ला निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. रत्नागिरी वेतन अधीक्षिका किशोरी करमुसे यांनी लेखाशीर्ष ०५११ मधील सगळ्या कनिष्ठ महाविद्यालयांचा पगार वेळेत होण्यासाठी लागणारा निधी शिक्षण संचालक कार्यालय पुणे यांचेकडे मागितला जातो असे स्पष्ट केले आहे. लेखाशीर्ष ०५११ ला मागणी पेक्षा निधीच कमी पाठवला जात असल्याने ही रत्नागिरी जिल्ह्यात परिस्थिती निर्माण झाल्याचे वेतन अधीक्षक किशोरी करमुसे यांनी सांगितले.
तांत्रिक बिघडामुळे मुख्याध्यापक लॉगिन वरून रत्नागिरी वेतन अधीक्षकांकडे नं जाता कोल्हापूर स्तरावर बिल जाणे, अपुऱ्या निधीमुळे उशिरा वेतन होणे या दुहेरी चक्रात ही अकरा कनिष्ठ महाविद्यालये सापडली आहेत. या गोष्टीवर उपाययोजना तात्काळ नं झाल्यास हा विषय आपण सभागृहात लावून धरणार असल्याचे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रसार माध्यमाना सांगितले आहे.

