( देवरूख )
देवरूख पोलिसांनी मध्यरात्री रंगलेली थरारक कारवाई करून गुटखा तस्करी करणारी गाडी हातखंबा येथे पकडली. या कारवाईत सुमारे ९ लाख ४१ हजार रुपयांचा गुटखा व गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास झावरे हे सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना दाभोळे येथे कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणारी गाडी संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे दिसले. पोलिसांनी जवळ जाताच चालकाने गाडी वेगात पळवली.
तत्काळ देवरूख पोलिसांच्या पथकाने पाठलाग सुरू करत हातखंबा ग्रामीण पोलिसांना कळवले. संयुक्त कारवाईत हातखंबा येथे ही गाडी अडवण्यात आली. झडती घेतली असता गाडीत विक्रीसाठी नेला जाणारा बेकायदेशीर गुटखा आढळून आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी अंमली पदार्थ व बेकायदेशीर व्यापारविरोधी मोहिम अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले असून, याअंतर्गत पोलिसांची रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. देवरूख पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

