(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई उभीवाडी आणि आकरवाडी येथे अज्ञात चोरट्याने भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून धाडसी चोरी करून संगमेश्वर पोलिसां समोर तपासाचे मोठे आवाहन उभे केले आहे. अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या केलेल्या घरफोडीत रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि घराच्या आवारात उभी केलेली दुचाकी असा एकूण 3 लाख 55 हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला असून याची फिर्याद रोजीना इरफान जुवळे यांनी माहिती दिल्याप्रमाणे संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
21 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी दीड वाजल्यापासून ते 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी रोजिना इरफान जुवळे (वय 49, रा. कडवई उभीवाडी) या आपल्या घराला कुलूप लावून गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेली 60 हजार रुपयांची रोकड आणि 2 लाख 45 हजार रुपये किमतीचे 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यावर डल्ला मारून तेथून पोबारा केला. चोरट्याचे एवढ्यावरच समाधान झाले नसल्याने त्याने फिर्यादी रोजीना जुवळे यांच्या परिसरात त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मुराद अल्ली काझी यांची सुमारे पन्नास हजार रुपये किमतीची होंडा ऍक्टिव्हा MH -02-GF-6159 बाहेर लावण्यात आली होती. त्या गाडीची चावी घरातील कपाटात त्यांचे हाती लागली होती. ती चावी दुचाकीला लावून त्याने दुचाकीही घेऊन तेथून पळ काढला.
रोजीना जुवळे यांच्या घरातून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मुराद काझी यांची दुचाकी असा एकूण 03 लाख 55 हजार रुपयांच्या मुद्देमामालावर अज्ञात चोरट्याने भरवस्तीत दिवसाढवळ्या डल्ला मारून पोलिसांसमोर तपासाचे मोठे आवाहन उभे केले आहे.
रोजीना जुवळे यांनी 23 नोव्हेंबर रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) कलम 305 (ए), 331 (3) आणि 331 (4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे कडवई परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

