(पुणे)
भिमाशंकरजवळील भिवेगाव देवकुंड धबधब्यात बुडून एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या स्थानिक तरुणाचा देखील बुडून मृत्यू झाला आहे. पुण्यातील भिमाशंकरजवळील भिवेगाव येथील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यात सोमवारी दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सहा डॉक्टरांच्या टीमसह फिरायला आलेले सुबोध करंडे हे धबधब्याच्या परिसरात भटकंती करत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकले. तोल जाऊन ते खोल पाण्यात ओढले गेले आणि स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करूनही ते बाहेर पडू शकले नाहीत. अचानक घडलेल्या या घटनेने त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित पर्यटकांमध्ये घबराट निर्माण झाली.
घटनेदरम्यान स्थानिक तरुण दिलीप वनघरे यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा जोरदार प्रवाह, खोल दरीसारखा पाणथळ भाग यामुळे त्यांनाही जीव वाचवणे शक्य झाले नाही. काही क्षणांतच दोघेही पाण्याखाली अदृश्य झाले.
स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी मिळून तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. दोऱ्यांचा वापर करून आणि उपलब्ध साधनांनी पाण्यात शोध सुरू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. काही तासांच्या प्रयत्नांनंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

