(नवी मुंबई)
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याला विकास आणि राजकीय अशा दोन्ही आघाड्यांवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बुधवारी त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे आणि मुंबईतील भूमिगत मेट्रो लाइन-3 च्या शेवटच्या टप्प्याचे (फेज 2बी) उद्घाटन केले. या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशाला (एमएमआर) मोठा फायदा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे ₹19,650 कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे बुधवारी (8 ऑक्टोबर) दुपारी उद्घाटन करण्यात आले. या भव्य सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्यातील अनेक मंत्री उपस्थित होते.
भारतातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प
सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) अंतर्गत उभारलेला हा विमानतळ भारतातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड प्रकल्प असून, मुंबई महानगर क्षेत्रातील दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) गर्दी लक्षणीयरीत्या कमी होईल आणि मुंबई जागतिक दर्जाच्या मल्टी-एअरपोर्ट सिस्टीममध्ये स्थान मिळवेल.
विकसित भारताचे चित्र या विमानतळात — पंतप्रधान मोदी
उद्घाटन सोहळ्यात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “लोकनेते दि. बा. पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या सेवाभावी वृत्तीने काम केले, ती प्रेरणादायी आहे. नवी मुंबई विमानतळ हा विकसित भारताचे स्वप्न साकार करणारा प्रकल्प आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत उभे राहिलेले हे विमानतळ संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक ठरेल.”
ते पुढे म्हणाले, “माझे स्वप्न होते की पायात साधी चप्पल घालणारा नागरिकाने देखील विमान प्रवास करावा, आज ते स्वप्न साकार होत आहे. देशात आता 160 विमानतळ कार्यरत आहेत आणि ‘उडान’ योजनेमुळे लाखो सामान्य नागरिकांनी पहिल्यांदा विमान प्रवासाचा अनुभव घेतला. त्यामुळे भारत आज जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत हवाई प्रवासी देश ठरला आहे.”
विकासात अडथळे आणणाऱ्यांवर टीका
मोदी यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटलं, “मधल्या काळात मुंबईकरांना हक्काच्या सुविधांपासून वंचित ठेवण्यात आलं. मेट्रो प्रकल्पांमध्येही अडथळे आणण्यात आले. मुंबई हे देशाचं सर्वात महत्त्वाचं शहर आहे, म्हणूनच दहशतवाद्यांनी ते लक्ष्य केलं. मात्र त्या वेळी काँग्रेस सरकारनं त्यांच्या समोर गुडघे टेकले. आजचा भारत कमजोर नाही — तो घरात घुसून मारतो, हे आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’मधून दाखवून दिलं आहे.”
दरवर्षी 9 कोटी प्रवासी आणि 32.5 लाख टन मालवाहतूक क्षमता
1,160 हेक्टर क्षेत्रावर पसरलेला हा विमानतळ भविष्यात दरवर्षी 9 कोटी प्रवासी आणि 32.5 लाख मेट्रिक टन मालवाहतूक हाताळण्यास सक्षम असेल. येथे ऑटोमेटेड पीपल मूव्हर (APM) टर्मिनल्सना शहराशी जोडेल. पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये 47 मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (SAF) साठवण आणि इलेक्ट्रिक बससेवा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा देशातील पहिला वॉटर टॅक्सीने जोडलेला विमानतळ असेल.
हे विमानतळ महाराष्ट्राच्या जीडीपीत एक टक्का वाढवेल — फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमानतळाचा उल्लेख ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असा करताना म्हटलं, “या विमानतळाचं स्वप्न गेली 50 वर्षं पाहिलं जात होतं. ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेतृत्व घेतलं. अवघ्या एका बैठकीत रखडलेल्या सर्व परवानग्या मार्गी लावल्या. हा एकच प्रकल्प महाराष्ट्राच्या जीडीपीत किमान एक टक्क्यांनी भर घालेल.”
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी आम्हाला स्पष्ट आदेश दिला की, सर्व परिवहन सेवा एका तिकिटावर जोडल्या पाहिजेत. त्यांच्या हस्ते ‘मुंबई वन’ अॅपचे लोकार्पण झाले असून, 11 परिवहन सेवा त्यात जोडल्या जातील. पुढचे लक्ष्य आहे वाधवन बंदर — जेथे देशातील पहिले ऑफशोर विमानतळ तयार होणार आहे.
मेट्रो लाईन 3 आणि ‘मुंबई वन’ अॅपचे लोकार्पण
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो लाईन 3 च्या अंतिम टप्प्याचे आणि ‘मुंबई वन’ अॅपचेही लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि उपनगरांच्या परिवहन प्रणालीत मोठा बदल होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, आगामी मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी राजभवनात भाजपाच्या मुंबईतील नेत्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत मुंबई पालिका निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती ठरवण्यात आली असल्याची माहिती मिळते.
राजभवनात रात्री बैठक आणि भोजन कार्यक्रम
पंतप्रधान मोदी राजभवनात मुक्काम करत असून, बुधवारी रात्री त्यांनी भाजपाच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांसोबत विशेष बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांच्यासह मुंबईतील सर्व 15 आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भोजनानंतर या सर्वांनी निवडणूक तयारीवर सविस्तर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
बीएमसी निवडणुकीसाठी आखली जाणार रणनीती
मुंबई महानगरपालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सत्ता गाजवत आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला कडवी टक्कर देत 82 जागा मिळवल्या होत्या, तर शिवसेनेने 84 जागा जिंकल्या होत्या. त्या वेळी दोन्ही पक्षांमधील समझोत्यामुळे शिवसेनेचा महापौर निवडला गेला होता. या वेळी भाजपाला शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा पाठिंबा असल्याने निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. विरोधक एकत्र आल्यास त्याला कसे उत्तर द्यायचे, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. मात्र, बैठक अंतर्गत स्वरूपाची असल्याने भाजप नेत्यांनी अधिकृतपणे काहीही भाष्य केलेले नाही.
आज (गुरुवार) बीकेसीत महत्त्वाचा कार्यक्रम
आज गुरुवारी (9 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर मुंबईत एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. दोन्ही नेते ‘व्हिजन 2035’ अंतर्गत भारत-यूके सामरिक भागीदारीचा आढावा घेणार असून, व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण, पर्यावरण आणि शिक्षण या विषयांवर चर्चा होईल. ते बीकेसीतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणाऱ्या ‘सीईओ फोरम’ आणि ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025’च्या सहाव्या आवृत्तीत सहभागी होतील. या परिषदेत 75 हून अधिक देशांतील 1 लाख प्रतिनिधी, 7 हजार 500 कंपन्या आणि 800 हून अधिक वक्ते सहभागी होणार आहेत. ‘वित्तीय क्षेत्राला अधिक सक्षम बनवणे’ या थीमवर आधारित ही परिषद कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष यावर केंद्रित असेल.

