(कोल्हापूर)
कोल्हापुरात घरगुती वादातून पत्नीचा गळा दाबून हत्या केल्यानंतर फरार झालेल्या पतीला लक्ष्मीपुरी पोलिसांनी शिताफीने कारवाई करत अटक केली आहे. गणेश शंकर हुबाळे (वय 43, रा. सोन्या मारुती चौक, शनिवार पेठ) असे आरोपीचे नाव आहे.
शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी गणेश आणि त्याची पत्नी स्वाती गणेश हुबाळे (वय 40) यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर जबर मारहाणीत झाले. रागाच्या भरात गणेशने स्वातीचा गळा आवळला. गंभीर जखमी अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल करून तो तेथून फरार झाला. सोमवारी, 16 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान स्वातीचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलम 103(1) अंतर्गत गणेशविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रेमविवाह, वाढता संशय आणि वाद
स्वाती आणि गणेश यांचा 2012 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. गणेश हा कोल्हापुरी फेट्याचा दुकानदार आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये सतत वाद होत होते व छळ केला जात असे. स्वातीला पतीचे बाहेरील संबंध असल्याचा संशय होता, अशी माहिती समोर आली आहे. स्वातीने माहेरच्या लोकांना छळाबाबत सांगितले होते. भाऊ प्रवीण भाट यांनीही सलोख्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
मारहाणीनंतर गणेशने स्वातीला रुग्णालयात दाखल केले, पण तिच्या अवस्थेबाबत माहेरच्या लोकांना काहीही माहिती दिली नाही. उलट ती बेपत्ता असल्याचे सांगितले. नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर स्वाती डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल असल्याचे उघड झाले. तेथे भेट दिल्यावर स्वातीने मारहाणीबाबत माहिती दिली होती.
स्वातीच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला. आरोपीला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला.
गुन्ह्यानंतर पसार झालेल्या गणेशच्या शोधासाठी लक्ष्मीपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके तैनात करण्यात आली. गोपनीय बातमीदाराच्या माहितीनुसार सीपीआर हॉस्पिटलजवळील एका भागात तो लपून बसल्याचे समोर आले. सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली.
चौकशीत गणेशने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली असून कारवाईच्या भीतीने फरार झाल्याचेही मान्य केले आहे. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

