(नवी दिल्ली)
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनधारकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२५ पासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत येणाऱ्या टोल नाक्यांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी ‘फास्टॅग वार्षिक पास’ उपलब्ध होणार आहे. या नव्या योजनेमुळे वाहनधारकांना टोलच्या लांबच लांब रांगा टाळता येणार असून वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.
काय आहे ‘फास्टॅग वार्षिक पास’?
▪ ३००० रुपयांत २०० टोल फेऱ्यांची सुविधा
▪ फक्त खासगी चारचाकी, जीप व व्हॅनसाठी लागू
▪ एक वर्षासाठी वैध किंवा २०० फेऱ्यांपर्यंत वापर करता येणार
हा पास केवळ खासगी वापरासाठी असलेल्या चारचाकी वाहनां, जीप किंवा व्हॅन साठीच उपलब्ध आहे. व्यावसायिक वाहने, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी ही योजना लागू नाही. यासंदर्भात केंद्र सरकारने १७ जून २०२५ रोजी अधिसूचना जाहीर केली होती.
पास कसा खरेदी कराल?
▪ एनएचएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अॅपवर उपलब्ध
▪ फास्टॅग क्रमांक आणि वाहन तपशील भरल्यानंतर ई-पेमेंटद्वारे ३००० रुपये भरावे लागतील
▪ पेमेंटनंतर २ तासांत पास अॅक्टिव्हेट होईल
▪ हा पास हस्तांतरण करता येणार नाही, किंवा इतर वाहनांसाठी वापरता येणार नाही
या मार्गांवर पास लागू नाही
जरी देशभरात बहुतांश राष्ट्रीय महामार्गांवर हा पास लागू असला तरी, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर मात्र हा पास लागू नसेल. त्यामुळे वाहनधारकांनी प्रवासापूर्वी मार्गाची माहिती तपासूनच पासाचा वापर करावा.
योजनेमुळे काय फायदे होतील?
▪ टोल नाक्यांवरील गर्दी कमी होणार
▪ वेळ आणि इंधनाची बचत
▪ वारंवार प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा
▪ डिजिटल व्यवहाराला चालना
ही योजना खासगी वाहनधारकांसाठी एक मोठा दिलासा ठरणार असून, राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवास अधिक सुलभ व वेगवान होईल, अशी अपेक्षा आहे.

