(रत्नागिरी)
तालुक्यातील काळबादेवी जेटीजवळ मासेमारी करताना बोटीवरून तोल जाऊन समुद्रात पडलेल्या प्रौढाचा मृतदेह अखेर दुसऱ्या दिवशी सापडला. गजानन महादेव पेडणेकर (वय ४५, रा. नेवरे काजिरभाटी, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
गजानन पेडणेकर हे गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी काळबादेवी जेटीजवळ बोटीवरून मासेमारी करत असताना तोल जाऊन समुद्रात पडले आणि बेपत्ता झाले होते. या घटनेची माहिती समीर अशोक शेट्ये (रा. काळबादेवी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती.
शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी काळबादेवी गावातील ग्रामस्थ शोध घेत असताना सायंकाळी चारच्या सुमारास किनाऱ्याजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

