(राजापूर / तुषार पाचलकर)
पत्नीच्या खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याप्रकरणी परुळे (ता. राजापूर) येथील गजानन जगन्नाथ भोवड या व्यक्तीस सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि ६,५०० रुपयांचा दंड सुनावला आहे.
ही घटना २५ सप्टेंबर २०२१ रोजी परुळे सुतारवाडी येथील जंगलमय भागात घडली होती. कौटुंबिक वादातून संतापाच्या भरात आरोपी गजानन भोवड याने पत्नी सिद्धी उर्फ विद्या भोवड हिचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह गवतामध्ये लपवून ठेवला होता. त्यानंतर पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची खोटी माहिती दिली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत गजानन भोवड सतत विसंगत व विरोधाभासी विधाने करत असल्याचे लक्षात आले. शेवटी सत्य उजेडात आल्यानंतर त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०२ (खून), २०१ (पुरावा नष्ट करणे), आणि १७७ (खोटी माहिती देणे) यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या खटल्यात सरकार पक्षाने एकूण १४ साक्षीदारांची साक्ष तपासली. आरोपीची बहिण, मेहुणा आणि गावचा सरपंच फितूर झाले असले, तरी परिस्थितीजन्य पुरावे, डॉक्टरांचे पोस्टमॉर्टेम अहवाल, पंचसाक्षीदार सतीश शिंदे, आणि मयत विद्या हिची बहिण सोनाली शिंदे यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या.
सुमारे महिनाभर चाललेल्या युक्तिवादानंतर सत्र न्यायाधीश ओ. एम. आंबाळकर यांनी आरोपीला खालीलप्रमाणे शिक्षा ठोठावली
कलम ३०२ (खून): जन्मठेप व ₹५,००० दंड
कलम २०१ (पुरावा नष्ट करणे): ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१,००० दंड
कलम १७७ (खोटी माहिती): १ वर्ष शिक्षा व ₹५०० दंड
दंडातील ₹५,००० रक्कम फिर्यादीच्या आईला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
या प्रकरणात अति. सरकारी वकील अॅड. प्रफुल्ल रामचंद्र साळवी यांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद केला, तर पोलीस शिपाई विकास खंदारे यांनी न्यायालयीन पैरवी केली. तपास पोलीस निरीक्षक परबकर यांनी केला होता.

