(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडणार आहे. या पवित्र श्रावण महिन्यातील अंगारकीच्या निमित्ताने संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने सर्व व्यवस्था नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्या आहेत.
स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे ३.३० वाजता खुले होईल. मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांच्या हस्ते पूजा, मंत्रपुष्प आणि आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल. चंद्रोदयानंतर रात्री १०.३० वाजेपर्यंत, सुमारे १८ तास, दर्शनाची सुविधा उपलब्ध असेल. या दिवशी ५० ते ६० हजार भाविक हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंदिर परिसरात दर्शनरांगेसाठी मंडप व पत्र्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक तैनात असेल. समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, देवस्थानचे सुरक्षारक्षक आणि इतर यंत्रणा कार्यरत राहतील.

गर्दी नियंत्रणासाठी जयगड पोलीस ठाणे आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी गस्त ठेवतील. वाहन पार्किंगची व्यवस्था सागर दर्शन पार्किंग, महालक्ष्मी हॉल परिसर, खारभूमी मैदान (मालगुंड) आणि इतर ठिकाणी केली आहे, ज्यावर वाहतूक शाखेचे कर्मचारी देखरेख करतील.
तालुका प्रशासनाने पाणीपुरवठा, विद्युत, आरोग्य आणि इतर सुविधा सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. घाटमाथ्यावरून आलेले दुकानदार दोन दिवसांपूर्वीच हजेरी लावून मंडपात आपली दुकाने उभारू लागले आहेत. काही गणेश मंडळांकडून महाप्रसादाचे आयोजनही केले जाणार आहे.
सायंकाळी ४.३० वाजता मंदिर प्रदक्षिणा मार्गे श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येईल. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि “मंगलमूर्ती मोरया”च्या जयघोषात परिसर भक्तीमय होईल. या मिरवणुकीत सरपंच डॉ. श्रीराम केळकर, पंच सदस्य, पुजारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि हजारो भाविक सहभागी होतील.

