( राजापूर )
भारताचे माजी कसोटीपटू, माजी कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर गुरुवारी आपल्या जन्मभूमी राजापूरमध्ये आले होते. राजापूर हे वेंगसरकर यांचे जन्मस्थळ असून येथेच त्यांचे बालपण गेले. राजापूर शहरातील प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रभात महादेव कुलकर्णी हे वेंगसरकर यांचे मामा असल्याने त्यांचे आजोळी राजापूरला नेहमीच येणे-जाणे असायचे.
दिलीप वेंगसरकर यांच्या रूपाने भारताला एक अत्यंत दर्जेदार आणि विश्वासार्ह फलंदाज लाभला होता. आज जसा विराट कोहली, राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांचा क्रिकेटवर दबदबा दिसतो, तसाच प्रभाव १९८० ते १९९२ या कालखंडात वेंगसरकर यांनी गाजवला होता. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर सलग तीन दौऱ्यांमध्ये त्यांनी भारतासाठी १०३, १५७ आणि १२६ नाबाद धावा केल्या होत्या. विशेषतः १९८६ साली केलेली नाबाद १२६ धावांची खेळी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती, कारण त्या खेळीमुळे भारताने प्रथमच लॉर्ड्सवर विजय मिळवला होता, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
गुरुवारी काही वैयक्तिक कामानिमित्त ते राजापूरमध्ये आले होते. या भेटीदरम्यान त्यांच्या बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. राजापूरमधील ते मौज मजेचे दिवस, शालेय जीवन आणि कुटुंबीयांबद्दल ते मनमोकळेपणाने बोलत होते. राजापूरमधील अनेक परिचित व्यक्तींना भेटल्याचा त्यांना विशेष आनंद झाला. आजचे हे क्षण माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
राजापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष नरेंद्र मोहिते तसेच शरद पळसुलेदेसाई यांनी दिलीप वेंगसरकर यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना पळसुलेदेसाई म्हणाले, दिलीप वेंगसरकर हे माझे आवडते फलंदाज असून ते राजापूरचे असल्याने ही भावना अधिकच जिव्हाळ्याची आहे. त्यांना कधीतरी भेटावे, असे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले. दिलीप सर यांची भेट मनाला खूप आनंद देणारी आणि कायम स्मरणात राहणारी ठरली.

