( रायगड )
रायगड श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव येथील भावेश नरेंद्र पोवळे (वय ३०) या युवकाचा बँक ऑफ महाराष्ट्रच्या दिघी शाखेतील एटीएममध्ये विद्युत धक्का बसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शुक्रवारी सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास भावेश पोवळे हे घरून दिघी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. सुमारे पावणे सातच्या सुमारास एटीएमचा दरवाजा उघडताच त्यांना जोरदार विद्युत प्रवाहाचा धक्का बसला आणि ते क्षणातच कोसळले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना दिघीहून बोर्लीपंचतनम येथील खाजगी रुग्णालयात हलवले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
निष्काळजीपणाचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी
या दुर्दैवी घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली आहे. एटीएम व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, संबंधित व्यवस्थापकावर भारतीय दंड संहिता कलम 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
भावेश पोवळे हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आई व भावाचा एकमेव आधार हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी तातडीने आर्थिक मदत आणि सरकारी पातळीवरील नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर एटीएममधील विद्युत यंत्रणेच्या देखभालीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बँक आणि संबंधित कंपन्यांनी अशा ठिकाणी विद्युत सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले नाहीत, तर अशा प्रकारचे अपघात पुन्हा घडू शकतात, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

