(हैद्राबाद)
14 ऑक्टोबर 2025 पासून मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 साठी मोफत सपोर्ट बंद ला आहे. जगभरातील सुमारे 40 टक्के वापरकर्ते अजूनही विंडोज 10 वापरत असल्याने या निर्णयाचा परिणाम लाखो संगणकांवर होणार आहे. यानंतर विंडोज 10 वापरणाऱ्या संगणकांना सॉफ्टवेअर अपडेट्स, सुरक्षा पॅचेस आणि तांत्रिक सहाय्य मिळणार नाही. त्यामुळे वापरकर्त्यांची डिव्हाइसेस व्हायरस, मालवेअर आणि सायबर हल्ल्यांना अधिक असुरक्षित ठरतील.
वापरकर्त्यांना सुरक्षित राहण्यासाठी विंडोज 11 वर अपग्रेड करणे, विस्तारित सुरक्षा अपडेट्ससाठी पैसे देणे किंवा लिनक्ससारख्या पर्यायी ऑपरेटिंग सिस्टमचा अवलंब करणे हे पर्याय उपलब्ध असतील. मायक्रोसॉफ्टनं 2021 मध्ये विंडोज 11 लाँच केलं असलं तरी सप्टेंबर 2025 पर्यंत सुमारे 40 टक्के विंडोज वापरकर्ते अजूनही विंडोज 10 वर आहेत. 14 ऑक्टोबरपासून विंडोज 10 साठी कोणतेही सॉफ्टवेअर अपडेट्स, सुरक्षा पॅचेस किंवा तांत्रिक सहाय्य दिलं जाणार नाही. यामुळे संगणक चालू राहतील मात्र सायबर धोक्यांपासून संरक्षण कमी होईल.
मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केलं आहे की, विंडोज 11 हे उच्च सुरक्षा आणि आधुनिक हार्डवेअरच्या मागण्या पूर्ण करणारं ऑपरेटिंग सिस्टम आहे, त्यामुळे वापरकर्त्यांनी शक्य तितक्या लवकर नवीन सिस्टमवर अपग्रेड करावं. तज्ज्ञांनी चेतावणी दिली आहे की विंडोज 10 वर राहणं म्हणजे हॅकर्ससाठी खुलं आमंत्रण आहे.
यूकेमधील ग्राहक संस्था ‘Which?’ च्या अंदाजानुसार सुमारे 50 लाख वापरकर्ते अजूनही विंडोज 10 वापरत आहेत. हॅकर्स जुन्या सिस्टममधील कमजोरी शोधून डेटा चोरीसाठी वापरकर्त्यांना लक्ष्य करतील असा इशारा ‘Which?’ टेक मासिकाच्या संपादक लिसा बार्बर यांनी दिला आहे. यामुळे डेटा सुरक्षेला आणि गोपनीयतेला गंभीर धोका निर्माण होईल. संगणक सुरक्षित ठेवण्याचा सर्वात सोपा आणि शिफारसीय मार्ग म्हणजे विंडोज 11 वर अपग्रेड करणे आहे.
गेल्या चार वर्षांत खरेदी केलेले बहुतेक पीसी विंडोज 11 साठी सुसंगत आहेत. यासाठी किमान 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज आणि टीपीएम 2.0 सुरक्षा चिप आवश्यक आहे. मायक्रोसॉफ्टने मोफत सुसंगतता तपासणी साधन उपलब्ध करून दिलं आहे, तर ‘Which?’ संस्थेने प्रोसेसरनुसार तपासणीसाठी ऑनलाइन साधन दिलं आहे. ज्या संगणकांना विंडोज 11 सुसंगतता नाही त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्टकडून ‘Extended Security Updates’ (ESU) योजना उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत वापरकर्त्यांना 13 ऑक्टोबर 2026 पर्यंत मर्यादित सुरक्षा संरक्षण मिळेल.
मायक्रोसॉफ्ट खात्याने साइन इन केल्यास ही सेवा मोफत मिळू शकते, अन्यथा सुमारे 30 डॉलर किंवा 1,000 रिवॉर्ड पॉइंट्स भरावे लागतील. विंडोज 11 सुसंगत नसलेल्या वापरकर्त्यांसाठी लिनक्ससारख्या मोफत आणि सुरक्षित ऑपरेटिंग सिस्टमचा पर्यायही उपलब्ध आहे. लिनक्स वितरण प्रणाली वापरायला सोपी असून नियमित सुरक्षा अपडेट्ससह मोफत उपलब्ध आहेत. यासाठी फाइल्सचा बॅकअप घेऊन यूएसबी ड्राइव्हद्वारे सिस्टम इन्स्टॉल करता येते. विंडोज 10 साठी मोफत समर्थन संपुष्टात येत असताना वापरकर्त्यांनी सायबर धोक्यांपासून बचावासाठी त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. विंडोज 11 वर अपग्रेड करणे, विस्तारित सुरक्षा अपडेट्स सक्रिय करणे किंवा लिनक्ससारख्या पर्यायी सिस्टमचा अवलंब करणे ही काळाची गरज बनली आहे.

