(मुंबई)
लाडकी बहीण योजनेतून महिलांना जुलैचा हप्ता देण्यात आला असून लवकरच ऑगस्ट महिन्याचेही पैसे वितरित होणार आहेत. मात्र, सुमारे ४२ लाख महिलांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही. लाखो महिलांचे अर्ज अपात्र ठरले असून सध्या योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी सुरू आहे.
अंगणवाडी सेविका घराघरांत जाऊन अर्जांची छाननी करतील. या प्रक्रियेत त्या महिलांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातील, जे योजनेच्या पात्रतेच्या निकषांशी संबंधित असतील.
अंगणवाडी सेविका विचारणार प्रश्न:
1. तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का?
2. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी इन्कम टॅक्स भरता का?
3. तुमच्या घरातील किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे?
4. तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे?
5. तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा पुरावा आणि वय किती आहे?
योजनेचे मुख्य निकष:
- महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
- वय योजनेच्या पात्रतेत बसले पाहिजे.
- वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी असावे.
- महिला सरकारी नोकरीत नसावी.
- एका कुटुंबातील २ पेक्षा जास्त महिलांना लाभ नसावा.
याआधीच्या एका तपासणीत तब्बल १४,००० पुरुषांनी १० महिन्यांपर्यंत या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती. ज्यामुळे सरकारला २१ कोटींपेक्षा जास्त रुपये मोजावे लागले. तसेच, २,००० पेक्षा जास्त सरकारी कर्मचा-यांनीही चुकीच्या पद्धतीने पैसे घेतल्याचे उघड झाले होते. हे प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारने तातडीने कठोर पावले उचलली आहेत.
‘फिजिकल व्हेरिफिकेशन’ करण्याचे आदेश
जिल्हा प्रशासनाला सर्व संशयित लाभार्थ्यांच्या अर्जांची आणि कागदपत्रांची ‘फिजिकल व्हेरिफिकेशन’ (प्रत्यक्ष पडताळणी) करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अंगणवाडी सेविका आणि स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. यात लाभार्थ्यांचे वय, कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि इतर कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यावर, जे लाभार्थी पात्र आढळतील त्यांना योजनेचा लाभ मिळत राहील. पण जे अपात्र ठरतील, त्यांची नावे तात्काळ यादीतून काढून टाकली जातील. यापुढे पात्रता तपासून योग्य महिलांना योजनेचा लाभ सुरू राहील, तर अपात्र ठरलेल्यांचे लाभ थांबवले जातील, असे आता स्पष्ट करण्यात आले आहे.

