(रत्नागिरी)
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात, भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक व मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत मागासवर्गीय, हुशार व गरजू विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी सुरू असलेल्या ‘पुस्तक पेढी योजना’ अंतर्गत पुस्तक संच वितरण तसेच अल्पावधीतच विद्यार्थीप्रिय ठरलेल्या ‘वाचक गट’ उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, ग्रंथालय समितीच्या समन्वयक व संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, हिंदी विभाग प्रमुख डॉ. एस. डी. मधाळे आणि ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून झाली. त्यानंतर पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी प्रास्ताविकात डॉ. रंगनाथन यांच्या कार्याची, संशोधनदृष्टीची व ग्रंथालयशास्त्रावरील त्यांच्या आत्मीयतेची माहिती दिली. तसेच महाविद्यालयीन ग्रंथालयातील वाचकाभिमुख सुविधा, पुस्तक पेढी योजना आणि वाचक गटाच्या वाढत्या प्रतिसादाबद्दल सांगून विद्यार्थ्यांनी या सर्व सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
डॉ. कल्पना आठल्ये यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या इतर मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यानंतर लाभार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्याच पसंतीनुसार वर्षभरासाठी वापरण्यासाठी पुस्तक संच वितरीत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी डॉ. रंगनाथन यांच्या ग्रंथालयशास्त्रातील पाच महत्त्वाच्या सूत्रांची ओळख करून दिली—
1. पुस्तके ही सजीव असून ती वापरासाठी आहेत.
2. प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीचा ग्रंथ मिळाला पाहिजे.
3. वाचकाचा वेळ वाचवला पाहिजे.
4. ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे.
5. वाचन चळवळ पुढे नेणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन आपले ज्ञान वाढवावे आणि महाविद्यालयाचे नांव उज्ज्वल करावे, असे त्यांनी सांगितले.
कु. सेजल मेस्त्री हिने पुस्तक पेढीविषयी मनोगत व्यक्त करताना, “वर्षभर अभ्यासासाठी आवश्यक पुस्तके मिळणे ही ग्रंथालयाची अमूल्य सेवा आहे,” असे सांगितले. कु. जान्हवी जोशी हिने वाचक गटाविषयी बोलताना, “अभ्यासाव्यतिरिक्त अतिरिक्त पुस्तक किंवा नियतकालिक घेता येणे ही सोय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढवते,” असे मत व्यक्त केले.
आभारप्रदर्शन कु. ओंकार आठवले आणि सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले. पुस्तक पेढी व वाचक गटात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता चहापानाने झाली.