( लांजा /रत्नागिरी प्रतिनिधी )
तालुक्यातील रूण पराडकरवाडी येथून चोरीला गेलेला तब्बल ३ लाख ५५ हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत मुंबईतून हस्तगत करत दोन चोरींचा भेद उघड केला. या कारवाईनंतर परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी ऋषिकेश अंकुश पराडकर (२७) याला अटक केली आहे.
प्रणय संजय पराडकर (२५, रा. रूण पराडकरवाडी) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शेजारी राहणाऱ्या ऋषिकेश पराडकर याने त्यांच्या घराचे कुलूप चावीने उघडून कपाटातील लॉकरमधून ५ ग्रॅम वजनाची, ४५ हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन लंपास केली. तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
दरम्यान, तपासादरम्यान दुसऱ्या शेजाऱ्यांनीही पोलिसांकडे धाव घेत आपल्या घरातून सोन्याची गंठण चोरीला गेल्याची तक्रार दिली. संशयित ऋषिकेश पराडकर त्यांच्या घरी वारंवार येत-जात असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या चौकशीत ऋषिकेशने दोन्ही चोरींची कबुली दिली.
पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल नासिर नावळेकर, विलास जाधव आणि कॉन्स्टेबल नितेश आर्डे यांनी ६ ऑगस्ट रोजी मुंबईच्या सांताक्रूझ परिसरात जाऊन ७ ऑगस्ट रोजी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. लांजा पोलिसांनी अल्पावधीत दोन चोरींचा छडा लावत सोन्याचा मौल्यवान मुद्देमाल सुरक्षित परत मिळवल्याने त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

