(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र मिळविताना भेडसावणाऱ्या अडचणींवर तोडगा काढावा, अशी मागणी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे यांच्यासह प्रतिनिधींनी मंगळवारी (१४ ऑक्टोबर २०२५) वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. रामानंद यांची भेट घेऊन सादर केले.
संघटनेने सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सध्या दिव्यांग प्रमाणपत्रासाठी तपासणी आणि प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया केवळ बुधवारी व शुक्रवारी या दोन दिवसांपुरती मर्यादित आहे. हे दिवस अपुरे ठरत असल्याने जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून येणाऱ्या अपंग बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ही प्रक्रिया आठवड्यातील संपूर्ण दिवस चालू ठेवावी, तसेच शक्य असल्यास अतिरिक्त दिवस वाढवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच तपासणीदरम्यान अपंगत्वाची टक्केवारी अन्याय्यपणे कमी दाखवली जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असल्याने, वैद्यकीय तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि मानवतावादी दृष्टीकोन राखावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, रुग्णालयात येणाऱ्या अपंग व्यक्तींना प्राथमिकतेने सेवा देण्यात यावी, त्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र व सुलभ पार्किंगची व्यवस्था करावी, तसेच प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी “वन-विंडो सिस्टीम” लागू करून सर्व सोयी एकाच ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. रामानंद यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवली आहे. दिव्यांग बांधवांप्रती संवेदनशीलता आणि सहानुभूती या भावनेतूनच हे निवेदन सादर करण्यात आले असून, रुग्णालय प्रशासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, असे महासंघाचे जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे यांनी सांगितले आहे.
या वेळी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे सचिव नंदकुमार कांबळे, उपाध्यक्ष गणपत ताम्हणकर, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास सावंत, सदस्य विजय कांबळे, आकाश कांबळे, अतुल कांबळे आदी उपस्थित होते.

