(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील ‘108’ रुग्णवाहिका सेवा ही आरोग्य यंत्रणेची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. मात्र प्रत्यक्षात या रुग्णवाहिकांची अवस्था पाहता रुग्णांचा जीव वाचविण्याऐवजी तो धोक्यात घालण्याचे काम सुरू असल्याचे धक्कादायक चित्र वारंवार समोर येत आहे. 108 रुग्णवाहिकेच्या पायऱ्या चक्क सुंभाने बांधलेल्या, दरवाजे दोरीने बांधून अडकवलेले, तर आतील यंत्रसामग्री नादुरुस्त अवस्थेत असतानाही जिल्हा शल्य चिकित्सकांनी 108 रुग्णवाहिकेबद्दल केलेल्या दाव्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ग्रामीण रुग्णालयातून गंभीर आजारी रुग्णांना जिल्हा रुग्णालयात आणताना अनेक वेळा या रुग्णवाहिका विविध तांत्रिक अडचणींनी ग्रासलेल्या दिसून येतात. ऑक्सिजन यंत्रणा, दरवाज्यांची सुरक्षितता, पायऱ्यांची मजबुती यांसारख्या मूलभूत बाबींकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत धावणाऱ्या रुग्णवाहिका जिल्ह्याची ‘जीवनदायिनी’ कशी ठरू शकते, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
एकीकडे व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उभे राहत असताना, दुसरीकडे जिल्हा शल्य चिकित्सकांनी ‘रत्नागिरी जिल्ह्यात 108 रुग्णवाहिका अतिजलद गतीने सेवा देत असून रुग्णांना जीवनदान देत आहेत’ असा दावा एका वृत्तसेवेच्या माध्यमातून केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रत्यक्ष वास्तव वेगळे असताना, जिल्हा आरोग्य विभाग झोपेचे सोंग तर घेत नाही ना, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
सुंभाने बांधलेल्या पायऱ्या, दोरीने अडकवलेले दरवाजे, नादुरुस्त यंत्रसामग्री आणि ढिसाळ सुरक्षितता असलेल्या वाहनांतून रुग्णांची वाहतूक सुरू असणे म्हणजे केवळ दुर्लक्ष नव्हे, तर उघड उघड जीवाशी खेळ आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल होत असलेल्या रुग्णवाहिकांची पाहणी केली असता, अनेक वाहनांची अवस्था ‘कागदावर सक्षम, प्रत्यक्षात अपंग’ अशीच दिसून येते. अशा परिस्थितीत दिले जाणारे स्पष्टीकरण हे वास्तव झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणावे लागेल. कार्यालयीन आकडेवारी आणि जमिनीवरील परिस्थिती यातील दरी इतकी खोल झाली आहे की, आरोग्य यंत्रणा नेमकी कोणासाठी काम करतेय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रुग्णांच्या सुरक्षिततेपेक्षा फाइल्स, अहवाल आणि बैठकींना प्राधान्य दिले जात असेल, तर ‘108’ ही सेवा जीवनदायिनी न राहता ‘धोका दायिनी’ ठरण्याची भीती नाकारता येत नाही. जिल्हा आरोग्य विभागाने वास्तवाकडे डोळे उघडून पाहावे आणि केवळ कार्यालयीन दाव्यांवर समाधान मानण्याऐवजी प्रत्यक्ष तपासणी करून जबाबदारी निश्चित करावी, अन्यथा हा निष्काळजीपणा एखाद्या गंभीर दुर्घटनेला निमंत्रण ठरू शकतो. रुग्णवाहिकांची नियमित तपासणी, दुरुस्ती, आवश्यक यंत्रसामग्रीची उपलब्धता आणि सुरक्षितता याबाबत ठोस कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य विभाग व 108 व्यवस्थापनावर असताना, ही सेवा अशा दयनीय अवस्थेत सुरू असणे म्हणजे थेट रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच सर्व 108 रुग्णवाहिकांची तांत्रिक तपासणी करून त्या सुरक्षित केल्यानंतरच सेवेत उतरवाव्यात, अशी मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.

